यवतमाळ – घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) : जाती, धर्मासाठी लढणारे शेतकऱ्यांसाठी बोलत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे. लोकशाहीने आपल्याला जो काही मूलभूत अधिकार दिला आहे. त्यानुसार आपल्याकडे सत्ताधाऱ्यांना चालवण्याचे अधिकार दिले आहे. मात्र, सत्ताधारी मतदात्यांना चालवत असल्याचे प्रतीत होत असून ते दुर्दैव असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांनी म्हटले आहे. आर्णी तालुक्यातील ओंकारेश्वर मंदिर, दाभडी येथे आयोजीत जाहीर सभेत बच्चु कडू बोलत होते.
पुढे बोलतांना बच्चु कडू म्हणाले की राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर समस्त शेतकरी बांधवांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. सत्ता स्थापन होताच ‘तो मी नव्हे’ च्या सरकारच्या पालटूपणा विरोधात राज्यभर शेतकऱ्यांना एकत्रित करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. परिणामी शासनाने समितीचे गठण देखील केले. मात्र अजूनही प्रश्न पूर्णतः निकाली लागला नसल्याने राज्याच्या विविध भागात जाऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमुक्ती सभा घेऊन शेतकरी व शेतमजूर यांच्या प्रश्नांना वाच्या फोडण्याचे काम माजी मंत्री बच्चु कडू यांनी सुरु केले आहे.
जगाचा पोशिंदा आपल्या पिकाला सन्मानजनक हमीभाव नसल्याने हतबल होऊन जीवन त्यागतो आहे. परंतु निर्दयी प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना त्याची किव येत नाही असे सांगून पुढील लढा तीव्र करणार असल्याचे ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांनी सांगितले. शेतकरी, शेतमजुर, दिव्यांग, मेंढपांळ व मच्छिमार यांच्यासाठी हक्काची लढाई आपण लढणार असल्याचे वक्तव्य यावेळी बच्चु कडू यांनी केले.
आज संपुर्ण आरणी आर्णी तालुक्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात पाण्याने हाहाकार माजवला असुन, माझ्या बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचे तर सरसकट जमीनीसह पीक खरडून गेली आहे. अशातच शासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे. त्यामुळे आपल्याला जागृत होणे गरजेचे असल्याचे बच्चु कडू यांनी विषद केले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे आर्णी तालुका अध्यक्ष रवी जाधव यांच्या सह तालुक्यातील इतर पदाधिकारी, शेतकरी बांधव, भगीणी आदी या कार्यक्रमाला मोठ्या संखेने उपस्थित होते.








