संग्रामपुर जि. बुलढाणा – संग्रामपुर तालुक्यातील वाण नदी पात्रात दिवसाढवळया रेतीचे अवैध उत्खनन सुरु असल्याचे चित्र आहे. तसेच तालुक्यातील हर्रास न झालेल्या पुर्णा नदी पात्रात पेसोडा येथून बोट व केनी मशिनचे सहाय्याने रेतीचे अवैध उत्खनन सुरु असल्याचे देखील दिसून येते.

या प्रकरणी शिवसेना किसान सेनेचे उप जिल्हाध्यक्ष अमोल ठाकरे यांनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले होते. तहसीलदार प्रशांत पाटील, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात आली होती. कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देखील देण्यात आला होता.
या निवेदनाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना तात्काळ खुलासा सादर करण्यासाठी तसे पत्र 13 मार्च रोजी दिले आहे. दरम्यान वान नदीपात्रात झालेल्या हजारो ब्रास रेती उत्खनन प्रकरणी संबंधितावर काय कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.







