जळगाव : रेल्वेत दरोडा टाकणा-या चौघांना जळगाव एलसीबी पथकाने साडे चार लाख रुपयांच्या रोकडसह अटक करण्यात आली आहे. रावेर रेल्वे स्टेशनवर जळगावच्या दिशेने येणा-या कामायणी एक्सप्रेसमधील प्रवाशाच्या डोक्यात मारुन त्याच्या कब्जातील रोख रकमेची बॅग पाच तरुणांनी हिसकावून पळ काढला होता. त्या बॅगेतील रोकडची आपसात वाटणी करण्यासाठी जमलेल्या चौघांना जळगाव शहरातील जीएस मैदानावरुन शिताफीने ताब्यात घेण्यात एलसीबी पथकाला यश आले. यातील एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे. किरण पंडीत हिवरे (रा. भातखेडा ता. रावेर), अजय सुपडू कोचुरे (रा. खिर्डी ता. रावेर), हरिष अनिल रायपुरे (रा. प्रतापपुरा बऱ्हाणपुर म.प्र.), गोकुळ श्रावण भालेराव (रा. डांभुर्णी ता. यावल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापैकी संदिप उर्फ आप्पा शामराव कोळी रा. डांभुर्णी ता. यावल हा फरार आहे.
काही संशयीत तरुणांची टोळी जळगाव शहरातील जीएस मैदानावर संशयास्पद अवस्थेत फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे सापळा रचून त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता गुन्ह्याचा घटनाक्रम उघडकीस आला. या घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलीसात सुधाकर धनलाल पटेल, (रा. बऱ्हाणपुर – मध्यप्रदेश) यांच्या फिर्यादीवरुन गु.र.नं. 452/2025 भा.न्या.स 2023 चे कलम 309(6) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ प्रितम पाटील, यशवंत टहाकळे, पोकॉ बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयुर निकम आदींसह तांत्रीक तपासकामी पो.कॉ. गौरव पाटील, मिलीद जाधव आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.







