यवतमाळ – घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) : बेलोरा वनपरीक्षेत्र परिसरात सर्रास सुरु असलेल्या अवैध सागवान वृक्षतोडीवर सावळी (सदोबा) वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या पथकाने धडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाईने सागतोड करणाऱ्या संबंधितांचे धाबे दणाणले आहे. या कारवाई दरम्यान 4.5 घनमीटर सागवान लाकडे जप्त करण्यात आली असून त्याची किंमत अंदाजे एक लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे.
या प्रकरणात सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात संदिप पवार, दिलीप सिडाम, ज्ञानेश्वर जाधव, प्रमोद जाधव, संतोष जाधव आणि दयाराम जाधव (सर्व रा. सुभाष नगर ता. आर्णी) या संशयित आरोपींचा समावेश आहे. अटकेतील सर्व संशयितांविरुद्ध वन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांना घाटंजी येथील दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी प्रविण पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सहाय्यक वनसंरक्षक दादासाहेब तौर यांच्या मार्गदर्शनाखाली सावळी (सदोबा) येथील वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रशेखर भोजने यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा तपास सावळी (सदोबा) वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयांअंतर्गत सुरू आहे.







