जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क)- आयुष मणियार आणि पियुष मणियार हे दोघे कडधान्य विक्रेता बंधू त्यांच्याकडील पिस्टल परवान्यामुळे चर्चेत आले आहेत. या दोघा बंधुंपैकी पियुष मणियार हा तरुण आता नव्याने चर्चेत आला आहे. दिपावली दरम्यान आयोजीत एका कार्यक्रमात पियुष मणियार याने त्याच्याकडील पिस्टलचे प्रदर्शन करत मंचावरील गायकावर नोटांची उधळण केली. या घटनेबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल केली. ती पोस्ट त्यांनी पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, नाशिक परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पाठवली. याशिवाय “कमर मे पिस्तोल, हाथ मे नोट – जलगाव की रात, पुलीस हॉलमे व्हिआयपी पार्टी – नोट और पिस्टल व्हायरल” अशा आशयाच्या बातमीचा एक व्हीडीओ देखील व्हायरल झाला. या व्हिडीओ सह फेसबुक पोस्टची पोलिस दलाने तात्काळ दखल घेतली आहे.

पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पियुष मणियार याच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.र.न. 301/25 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 30, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 135 नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस उप निरीक्षक गोपाल देशमुख या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
जळगावच्या आयुष कमलकिशोर मणियार आणि पियुष कमलकिशोर मणियार या दोघा बंधूंना शासनाने अगोदर नाकारलेला शस्त्र परवाना नंतर अधिकारी बदलताच देण्यात आला. कडधान्य विक्रेता असलेल्या मणियार बंधूंना शस्त्र परवान्याची खरोखरच गरज आहे का? असा एक प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. या मणियार बंधूंवर यापुर्वी कोणताही जीवघेणा हल्ला झाला नाही आणि शस्त्र परवाना मिळाल्यानंतर देखील झालेला नाही. त्यांचे समाजसेवेशी निगडीत कोणतेही उद्योग नाहीत. त्यामुळे त्यांचा शस्त्र परवाना अद्याप बाद का झाला नाही असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत. कमरेला पिस्टल खोचून हे बंधू समाजात दहशत पसरवतात असे नेहमीच म्हटले जाते. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी या मणियार बंधूंचा शस्त्र परवाना रद्द करण्याची मागणी सन 2023 मधे शासन दरबारी केली होती.
अभिजीत राऊत हे जिल्हाधिकारी म्हणून जळगाव जिल्ह्याचा कारभार बघत असतांना त्यावेळी पोलिस अधिक्षक प्रविण मुंडे, पोलिस उप विभागीय अधिकारी कुमार चिंता, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे अशी टीम कार्यरत होती. त्यावेळी या मणियार बंधूंच्या शस्त्र परवाना प्रकरणाची सुरुवात एमआयडीसी पोलिस स्टेशन स्तरावरुन झाली होती. त्यावेळी तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी या शस्त्र परवान्याला नकार दिला होता. त्यानंतर पुढील टप्प्यात उप विभागीय पोलिस अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणा-या कुमार चिंता यांनी देखील हे प्रकरण नाकारले होते. त्याच प्रमाणे पुढील महत्वाच्या टप्प्यात पोलिस अधिक्षक प्रविण मुंडे आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासमोर हे प्रकरण तग धरु शकले नाही व ते नाकारण्यात आले. सर्वच स्तरावर या मणियार बंधूंच्या शस्त्र परवान्याला नकारघंटा मिळाल्यानंतर त्यांच्यावर कोणताही जीवघेणा हल्ला झाला नाही. त्यामुळे आपल्याला खरोखरच शस्त्र परवान्याची गरज आहे हे सिद्ध होऊ शकले नाही.
त्यानंतर या मणियार बंधूनी अधिकारी बदलण्याची वाट पाहिली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी अमन मित्तल आले. अमन मित्तल आणि या मणियार बंधूंची वैचारीक पातळी कुठेतरी जुळून आल्याचे म्हटले जाते. त्याच कालावधीत एमआयडीसी पोलिस स्टेशनला जयपाल हिरे या तरुण अधिका-याची नियुक्ती झाली. त्यांच्यापुढे नव्याने शस्त्र परवाना मिळण्याचे प्रकरण या दोघा बंधूंनी सादर केले. तरुण पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी या दोघा तरुण वयातील मणियार बंधूंना शस्त्र परवाना मिळण्यासाठी रिमार्कच्या माध्यमातून हिरवी झेंडी दिली. याच कालावधीत पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, पोलिस उप अधिक्षक संदीप गावीत आणि डीएसबी पीआय रंगनाथ धारबळे अशी टीम नव्याने कार्यरत झाली होती. एमआयडीसी पोलिस स्टेशनपासून मणियार बंधूंना नाहरकत मिळाल्यानंतर पुढील टप्प्यात सर्वच ठिकाणी आणि पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या वतीने पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी हे प्रकरण होकारार्थी म्हणून पुढे रेटले. शेवटच्या टप्प्यात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दोघा मणियार बंधूना शस्त्र परवाना मंजूर केला. एकदा शस्त्र परवाना नामंजूर झाल्यानंतर पुन्हा देता येत नाही असे म्हटले जाते. त्यासाठी अपिलात जावे लागते असे म्हटले जाते. मात्र या मणियार बंधूंना शस्त्र परवाना कसा काय देण्यात आला असा प्रश्न जनतेला पडला आहे.
शस्त्र परवाना मिळाल्यानंतर हे दोघे बंधू कमरेला शस्त्र लावून प्रदर्शन व दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय तक्रार माहिती उघड न करण्याच्या अटीवर जळगावचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना नागरिकांकडून मिळाली. त्या माहितीच्या आधारे दीपककुमार गुप्ता यांनी या मणियार बंधूंचा शस्त्र परवाना रद्द करण्याची मागणी शासन दरबारी रेटून नेली ती आजतागायत कायम आहे.








