ड्रायव्हरच निघाला 25 लाखाच्या लुटीचा  सुत्रधार

On: November 1, 2025 10:37 AM

जळगाव : भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या 25 लाख 42 हजार रुपयांच्या लुटीचा गुन्हा भुसावळ तालुका पोलिसांनी अवघ्या 48 तासात उघडकीस आणला आहे. या गुन्ह्याचा फिर्यादी ज्या कार्यालयात कामाला आहे त्याच कार्यालयातील ड्रायव्हर या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार असल्याचे उघडकीस आले आहे.  शाहीद बेग असे या सुत्रधाराचे नाव आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दि. 28 ऑक्टोबर रोजी रात्री 10.20 वाजता फिर्यादी मोहम्मद यासीन हे कार्यालयात जमा झालेली 25 लाख 42 हजाराची रोकड दुसऱ्या दिवशी बँकेत जमा करण्यासाठी घरी नेत होते. मोटार सायकलने घरी जात असताना खडके शिवारातील कच्च्या रस्त्यावर तीन अनोळखी इसमांनी धक्का देऊन त्यांच्या कब्जातील रोख रकमेची बॅग बळजबरीने हिसकावली होती. 

भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. फिर्यादी काम करत असलेल्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल लोकेशन आणि सीडीआर तपासले असता घटनेच्या दिवशी ड्रायव्हर शाहिद वेग याचे इतर आरोपीसोबत बोलणे झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच ते सर्व जण घटनास्थळावर एकत्र असल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले. कार्यालयातील ड्रायव्हर शाहीद बेग याच्यावर पोलिसांचा संशय बळावला.

शाहीद बेगनेच पैशांच्या ने-आण करण्याच्या वेळेची माहिती त्याचे साथीदार मुजाहीद मलीक आणि मोहम्मद दानिश यांना दिल्याची कबुली दिली. त्यानंतर या तिघांनी रावेर तालुक्यातील अजहर फरीद मलक, अमीर खान युनुस खान आणि ईजहार बेग इरफान बेग या तिघांच्या मदतीने प्रत्यक्ष दरोडा टाकला. पोलिसांनी मुख्य सूत्रधार शाहीद बेगसह एकूण सहा लुटारुंना शुक्रवार 31 ऑक्टोबर रोजी अटक केली. त्यांच्याकडून लुट केलेल्या रकमेपैकी 23 लाख 42 हजार रुपये रोख आणि ३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. 

यातील आरोपींपैकी काहींवर मलकापूर आणि रावेर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अटकेतील आरोपींना 3 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. उर्वरित दोन लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्याचे काम सुरू आहे. उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या सह त्यांचे सहकारी श्रीमती. पुजा अंधारे, पो.हे.कॉ. संजय तायडे, पोहेकॉ. वाल्मीक सोनवणे, पाहेकॉ. सुधीर विसपुते, पो.हे.कॉ. जितु ठाकरे (सर्व नेम. भुसावळ तालुका पो स्टे) तसेच एलसीबी चे श्रे.पो.उप. निरी. रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ. उमाकांत पाटील, पो.हे.कॉ. प्रेमचंद सपकाळे, पो.ना.श्रीकृष्ण देशमुख, पो.ना.विकास सातदिवे, पो.कॉ. प्रशांत परदेशी, पो.कॉ. राहुल वानखेडे, पो.कॉ. ईश्वर पाटील, चापोहेकॉ. दर्शन ढाकणे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment