जळगाव – रेल्वे अंडरपासमधे पोलिसांचे वाहन हळू झाल्याचा गैरफायदा घेत वाहनातून हातातील बेड्यांसह पसार झालेल्या दोघा गुन्हेगारांना एलसीबी पथकाने दिल्ली येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे. शाकीर शहा अरमान शहा आणि अमजद शेख फकिर कुरेशी अशी पकडण्यात आलेल्या दोघा गुन्हेगारांची नावे आहेत. अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल गुरे चोरीच्या गुन्ह्यात चौघा गुन्हेगारांना अमळनेर पोलिस स्टेशनला नेत असतांना हा प्रकार घडला होता.
अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल गुरे चोरीचे दोन गुन्हे व पहुर पोलिस स्टेशनला दाखल एक गुन्हा चौघांनी कबुल केला होता. अमळनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात चौघांना देण्यासाठी एलसीबी पथक जात होते. अमळनेर नजीक असलेल्या रेल्वेच्या अंडरपास बोगद्यात असलेल्या स्पीड ब्रेकरमुळे वाहनाचा वेग कमी होताच संधी साधून चौघांपैकी दोघांनी हातातील बेड्यांसह पलायन केले होते. या घटनेप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गु.र.न. 428/25 भारतीय न्याय संहिता 262 नुसार 23 ऑक्टोबर 2025 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला.
या प्रकारामुळे पो.हे.कॉ. संदीप रमेश पाटील, पो.हे.कॉ.प्रविण जर्नादन मांडोळे, पो.हे.कॉ. हरीलाल पाटील, पो.कॉ. राहुल कोळी या चौघा कर्मचा-यांना निलंबीत करण्यात आले. हे चौघे कर्मचारी अद्याप एलसीबीतच कार्यरत असल्याची ओरड झाल्यानंतर त्यांची रवानगी मुख्यालयी करण्यात आली आहे.
फरार दोघा गुन्हेगारांचा शोध घेण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे, श्रे.पो.उप.निरी.रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ. अक्रम शेख, पो.हे.कॉ. प्रवीण भालेराव, पो.कॉ. प्रदिप सपकाळे, चा.पो.हे.कॉ. दिपक चौधरी, चा.पो.हे.कॉ. भरत पाटील आदींच्या पथकाने सहभाग घेतला.






