जळगाव : रस्तालुटीच्या घटनेतील चौघा जणांना धरणगाव पोलिसांच्या पथकाने गुन्ह्यातील वाहनासह अवघ्या चार तासात जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्यानजीक 12 नोव्हेंबरच्या रात्री कन्स्ट्रक्शन कंपनीचे पथक चारचाकी वाहनाने मार्गक्रमण करत असतांना त्यांची लुट झाली होती. या घटने प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पाळधी दुरक्षेत्र अधिकारी प्रशांत कंडारे यांनी तातडीने पुर्ण करुन गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.
एका बांधकाम कंपनीचे सुपरवायझर, कामगार ठेकेदार व काही कामगार असे सर्वजण खामगाव येथील साईटचे काम आटोपून चारचाकी वाहनाने पुढे जात होते. वाटेत मुसळी फाट्यावरील एका हॉटेलवर जेवण करुन त्यांनी पुढील प्रवासाला पुन्हा सुरुवात केली. दरम्यान त्यांच्या वाहनाच्या मागून आलेल्या कार चालकाने त्यांना ओव्हरटेक करुन त्यांना अडवले. त्या कारमधील उतरलेल्या चौघांनी मिळून बांधकाम सुपरवायझरसह सर्वांना बेदम मारहाण केली. त्यांच्या जवळ असलेले तिस हजार रुपये जबरीने हिसकावून मारहाण करणारे त्यांच्या ताब्यातील कारने पळून गेले.
पोलीस निरीक्षक सुनिल पवार व त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे,फौजदार संतोष पवार, पोहेकॉ महेंद्र बागुल, समाधान भागवत, सुधीर चौधरी, पोकॉ संदीप पाटील, किशोर भोई आदींनी घटनास्थळाला भेट दिली. गोपनीय माहितीच्या आधारे सुरुवातीला सुनिल अशोक कु-हाडे व विजय मेवालाल मोहीते या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अधिक चौकशी व तपासाअंती गणेश लक्ष्मण अहिरे व कृष्णा अशोक राठोड या दोघांना त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून लुटण्यात आलेल्या तिस हजारापैकी 29 हजार 700 रुपये रोख हस्तगत करण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास पाळधी दुरक्षेत्रचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे करत आहेत.







