जि. प. कर्मचाऱ्यांना कोंडणाऱ्या ठेकेदारा विरुद्ध गुन्हा 

On: December 7, 2025 6:51 AM

जळगाव – कामाचे बिल अदा होत नसल्याने वैतागलेल्या ठेकेदाराने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडून ठेवण्याचा प्रकार घडला. या घटनेप्रकरणी निलेश पाटील या ठेकेदाराविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलजीवन मिशनच्या कामाचे बिल अदा होत नसल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात पाच डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. 

जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी जलजीवन मिशनची कामे करण्यात आली. निधी उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील ठेकेदारांच्या कामाची बिले अडकली आहेत. अपूर्ण निधी मिळाल्याने ठेकेदारांना काही प्रमाणात रक्कम अदा करण्यात आली. ठेकेदार नीलेश पाटील याचेही बिल थकीत असल्याने ते जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात पोहोचले. प्रलंबित बिल अदा न केल्याच्या कारणावरून ते संतापले. 

तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘तुम्ही कामकाज कसे करता ते पाहतो’ अशी धमकी देत त्यांनी कार्यालयाचा बाहेरून दरवाजा बंद करून कडी लावून घेतली. हा प्रकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्यापर्यंत गेला. या प्रकरणी पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ट सहायक किशोर वसंत निकम यांनी शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment