एक लाखाच्या बदल्यात दहा लाखाचे आमिष दाखवणारे दोघे जेरबंद

On: December 27, 2025 12:12 PM

जळगाव : एक लाख रुपयांच्या बदल्यात दहा लाख रुपये मिळवा तसेच सोन्याची नाणी-विटा, काळी हळद, रेड मर्क्युरी, नागमणी या सारख्या मौल्यवान वस्तू मिळवा अशा प्रकारचे प्रलोभन दाखवणारे फसव्या जाहीरातीचे व्हीडीओ समाज माध्यमात प्रसारीत करणा-या दोघांना मुक्ताईनगर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. दोघांकडून चिल्ड्रन बॅंकेच्या नकली नोटांचा साठा व पाच मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.

मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी, लालगोटा, हलखेडा, जोधनखेडा, चारठाणा या परिसरातील काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी समाज माध्यमात फसव्या जाहीरातीचे व्हिडीओ तयार करुन प्रसारीत केले होते. मधापुरी व लालगोटा ही गावे अशा प्रकारच्या फसवणूकीसाठी कुप्रसिद्ध आहेत. यापुर्वी देखील या गावांमधे फसवणूकीसह मारहाणीचे प्रकार घडले आहेत.

फसव्या जाहीरातीच्या व्हीडीओमधे नमुद मोबाईल क्रमांकाच्या आधारे मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ व त्यांच्या सहका-यांनी तपास केला. त्यात शिवकुमार शमी भोसले, देवकुमार शिवराज भोसले व सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले (सर्व रा. लालगोटा, ता. मुक्ताईनगर) यांचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 62, 3 (5) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी देवकुमार शिवराज भोसले व सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या नकली कागदी नोटा व पाच मोबाइल जप्त करण्य्हात आले. डिवायएसपी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आशिष आडसूळ, एपीआय राजेंद्र चाटे, उपनिरीक्षक नयन पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment