जळगाव – गॅस कटरच्या सहाय्याने एटीम फोडण्याचा चौघे जण प्रयत्न करत असतांना त्यातील लाखोंची रोकड जळाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिनांक 3 जानेवारीच्या पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास जळगाव एमआयडीसी परिसरातील जकात नाक्यानजीकच्या एटीएम केंद्रात हा प्रकार घडला. कारमधून आलेल्या चौघांनी हा प्रकार केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधे कैद झाले आहे. एटीएममध्ये अकरा लाख रुपयांची रक्कम लोड करण्यात आली होती. त्यातील किती रक्कम ग्राहकांनी काढली होती, त्याची पडताळणी केल्यानंतर नेमक्या जळीत रकमेचा आकडा स्पष्ट होईल.
जळगाव ते अजिंठा रस्त्यावर एमआयडीसी परिसरातील जकात नाक्याजवळ स्टेट बैंक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. त्याठिकाणी शनिवारी पहाटेच्या सुमारास चौघा चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने एटीएम मशिन कापून त्यातील रक्कम लांबवण्याचा प्रयत्न केला. मशीनचा बराच भाग कटरने कापला गेला. त्यामुळे आतील नोटांनी पेट घेतला. त्यानंतर चोरट्यांनी तेथून पलायन केले. जळीत रकमेचा आकडा निश्चित झाल्यानंतर एटीएम मधे रक्कम जमा करणारी मक्तेदार एजन्सी गुन्हा दाखल करणार आहे.







