जळगाव – खून करून मृतदेह बेवारस दाखवण्याचा प्रकार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. भाऊसाहेब अभिमन पवार (रा. मराठे गल्ली पातोंडा ता. अमळनेर) असे मयत इसमाचे तर हुसेन शेख आयुब शेख (रा. ट्रान्सपोर्ट नगर जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
जळगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीत अजिंठा चौफुलीनजीक बाबा बॅटरी समोर एक बेवारस इसम बेशुध्द अवस्थेत पडलेला होता. एमआयडीसी पोलिसांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. मयत इसमाला कुणीतरी मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पुढील तपासाला दिशा देण्यात आली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हे कॉ अक्रम शेख, मुरलीधर धनगर, किशोर पाटील, राहुल कोळी यांनी पुढील तपासाला सुरुवात केली.
घटना स्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रीक विश्लेषणासह गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार मयताचे भाऊसाहेब अभिमन पवार असे निष्पन्न करण्यात आले. मयत हा अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी होता. तसेच तो हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता.
संशयित आरोपीतास एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या विरुद्ध एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला गु. र. न. 31/2026 बीएनएस 2023 चे कलम 103(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ करत आहेत.







