उधारीचा वाद दिवसेंदिवस वाढतच गेला —- आकाशच्या हातून बाळू जिवानिशी मेला

On: January 25, 2026 9:29 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क ): उधार उसणवारीच्या वादातून हाणामारीच्या घटना घडत असतात. अशा प्रसंगी एखादी प्राणघातक हल्ल्याची घटना दुर्दैवाने घडते व त्यात एखाद्याचा जीव देखील जातो. आजच्या युगात पैसे देणा-याचा फोन आला तर तो पटकन उचलला जातो. मात्र पैसे मागणा-याचा फोन आल्यास तो लवकर उचलला जात नाही. कधी कधी पैसे मागणा-याचा फोन समोरची व्यक्ती उचलतच नाही. त्यामुळे पैसे मागणा-याचा संताप अनावर होऊन प्रसंगी अप्रिय घटना देखील घडते. आर्थिक व्यवहार जपून करण्याची खबरदारी कित्येक जण घेत असतात. मात्र एखाद्याची अडचण बघून आणि त्याच्यावर विश्वास ठेवून एखादी व्यक्ती गरजू व्यक्तीला मदत करते. मात्र ज्यावेळी उधार दिलेले पैसे आपल्याला मिळत नाही हे लक्षात आल्यावर उधार देणारा चिडतो आणि त्याच्या हातून संतापाच्या भरात अनर्थ घडतो.

जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीत भोलाणे हे गाव आहे. या गावात आकाश रामकृष्ण कोळी हा तरुण रहात होता. याच गावात बाळू सदाशिव कोळी हा तरुण देखील रहात होता. आकाश कोळी यास आकाश टेलर या नावाने गावातील सर्वजण ओळखत होते. आकाश कोळी आणि बाळू कोळी हे दोघे एकमेकांचे मित्र होते.

एके दिवशी बाळू यास वैद्यकीय उपचारासाठी तिस हजार रुपयांची गरज होती. त्यामुळे बाळूने त्याचा मित्र आकाशकडे उधार स्वरुपात पैशांची मागणी केली. बाळूची वैद्यकीय निकड लक्षात घेत आकाशने त्याला तिस हजार रुपये उधार दिले. त्यामुळे बाळूची गरज आणि वेळ भागली. आकाशला त्याची रक्कम वेळेवर परत करणे बाळूला क्रमप्राप्त होते. मात्र तसे झाले नाही. दिवसामागून दिवस जात होते. बाळूने आकाशला त्याची तिस हजार रुपयांची रक्कम वेळेवर परत केली नाही. त्यामुळे आकाश त्याने उधार दिलेल्या तिस हजार रुपयांच्या मागणीसाठी बाळूकडे तगादा लावत होता. बाळू नाही म्हणत नव्हता आणि ती रक्कम आकाशला परत देखील करत नव्हता. त्यामुळे चालढकल करणा-या बाळूवर आकाश चिडून होता. तो बाळूला सातत्याने त्याच्या रकमेसाठी फोन करत असे. मात्र चालढकल करण्याचे बाळूचे काम सुरुच होते. त्यामुळे दोघा मित्रांमधे वादाची ठिणगी पडण्यास सुरुवात झाली. दोघातील वाद इतर नातेवाईक आणि मित्रांच्या हस्तक्षेप आणि सामंजस्याने मिटवण्यात आला होता. त्यानंतर दिवसामागून दिवस निघून गेले आणि वर्ष देखील उलटून गेले.

14 जानेवारी हा मकर संक्रांतीचा दिवस उजाडला. या दिवशी सर्वत्र तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे बोलून मागचे वाद विसरण्याचा दिवस उजाडला. मात्र याच दिवशी कटू आवाज ऐकून आपल्यावर प्राणघातक हल्ला होणार असल्याचे बाळूच्या ध्यानीमनी देखील नव्हते. या दिवशी रात्री आठ वाजेच्या सुमारास आकाशने बाळूला त्याच्या मोबाईलवर कॉल केला. बस स्थानकावर उभा असलेला आकाश हा त्याच्या मोबाईलवरुन पलीकडे बाळूला शिवीगाळ करु लागला. तु बस स्टॅंडवर ये आज तुझा काटाच काढतो असे म्हणत आकाश हा बाळूला शिवीगाळ करत होता. त्यावेळी बस स्थानकावर बाळूचा भाऊ नरेंद्र उभा होता. आपल्या भावाला आकाशकडून होत असलेली शिवीगाळ  नरेंद्र कोळी ऐकत होता.

काही वेळातच बस स्थानकावर बाळू आला आणि आकाशच्या समोर हजर झाला. “तु मला शिवीगाळ का करतो असे बाळूने आकाशला प्रश्न केला. त्यावेळी आकाशचे नातेवाईक रामकृष्ण कोळी व प्रकाश कोळी हे देखील काही वेळातच बस स्ठानकावर आकाशचे समर्थन करण्यासाठी हजर झाले. आकाशसोबत सर्वजण बाळूला शिवीगाळ व चापटा बुक्क्यांनी मारहाण करु लागले.

आपल्या भावाला शिवीगाळ व मारहाण होत असल्याचे बघून बाळूचा भाऊ नरेंद्र याच्यासह कृष्णा अरुण कोळी, गोपाल अशोक कोळी, जयेश बाळु कोळी, विशाल बाळु कोळी असे सर्वजण भांडण सोडवण्यासाठी सरसावले. मात्र कुणाला न जुमानता रामकृष्ण ताराचंद कोळी व प्रकाश ताराचंद कोळी यांनी बाळु कोळी यास घट्ट पकडून ठेवले. बाळूला दोघांनी पकडून ठेवल्याचा गैर फायदा घेत आकाशने त्याच्यावर पाठीमागून धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. बाळूच्या मानेवर दोन ते तिन वेळा जोरदार प्राणघातक हल्ला झाल्याने त्याच्या मानेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला. रक्तबंबाळ झालेला बाळू काही क्षणातच जमीनीवर कोसळला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाळूची अवस्था बघून त्याचा भाऊ नरेंद्र आणी इतरांनी मिळून आकाशच्या हातातील लोखंडी कोयता हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत नरेंद्रचा पुतण्या जयेश कोळी याच्या हातावर आकाशने कोयत्याने हल्ला केला. त्यात जयेश जखमी झाला. झटापटी दरम्यान नरेंद्रच्या कमरेवर आकाशने हल्ला चढवला. त्यात त्याला देखील दुखापत झाली. आपल्याला विरोध होत असल्याचे बघून आकाशने त्याच्या ताब्यातील गावठी पिस्टल दाखवून दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.      

या कालावधीत घटनास्थळावर गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली. लोकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाल्यानंतर भांडणाची सोडवासोडव झाली आणि हल्लेखोर आकाश तेथून निघून गेला. रक्ताच्या थारोळ्यातील बाळूला बघून काही जणांना भोवळ आली आणि ते बेशुद्ध पडले. जखमी बाळूवर वैद्यकीय उपचार लागलीच होण्यासाठी परिस्थितीचे भान ठेवत जयेश कोळी व कृष्णा कोळी या दोघांनी त्याला मोटार सायकलवर बसवून लागलीच जळगाव येथे शासकीय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणीअंती बाळूला मयत घोषित केले.

दरम्यानच्या कालावधीत घटनास्थळावरुन पळून गेलेला हल्लेखोर आकाश कोळी हा त्याच्या घरात आतून दरवाजा बंद करुन लपून बसला होता. त्याचवेळी त्याचा चुलत भाऊ चेतन कोळी हा जळगाव येथे मजुरी काम करण्यासाठी मोटार सायकलने जात होता. त्याला रस्त्याने जात असल्याचे घरात लपून बसलेल्या आकाशने खिडकीतून पाहिले. चुलत भाऊ चेतन खिडकीतून दिसताच आकाशने त्याला बघून जोरात आरोळी मारली.

आकाशने खिडकीतूनच त्याला जवळ बोलावून सोबत येऊ देण्याची विनंती केली. चेतन सोबत गावातून गुपचूप पळून जाण्यात आकाश यशस्वी झाला. आकाशला गावातून पळवून नेण्यास चेतन याने मदत केली. त्यामुळे गावक-यांच्या रोषाला सामोरे जाण्यापासून आकाशची सुटका झाली. जळगावच्या दिशेने दोघे जात असतांना बाळू मरण पावल्याची दोघांना माहिती समजली. त्यामुळे गावातील वातावरण बिघडण्याची शक्यता लक्षात घेत आकाशने अन्यत्र पळून जाण्याचा बेत आखला. आकाशने गुन्हा केला असल्याची माहिती असून देखील त्याला चुलत भाऊ चेतन याने पळून जाण्यास साथ दिली होती.

दोघे जण मोटार सायकलने चोपडा तालुक्यातील एका नातेवाईक महिलेच्या घरी गेले. आम्ही शिरपूर येथे कामानिमीत्त गेलो होतो. मात्र उशीर झाल्याने आम्हाला मुक्काम करायचा आहे असे खोटे सांगून दोघांनी त्या नातेवाईक महिलेकडे रात्रभर मुक्काम केला.      

या कालावधीत मरण पावलेल्या बाळूचा भाऊ नरेंद्र कोळी याने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव तालुका पोलिस स्टेशनला संशयीत हल्लेखोर  आकाश कोळी, रामकृष्ण कोळी, प्रकाश कोळी यांच्याविरुद्ध बाळू कोळी याच्या खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.नं. 9/2026 भारतीय न्याय संहिता 103 (1), 118 (2), 115 (2), 351 (2), 352, 3 (5) सह आर्म अ‍ॅक्ट 3/25, 4/25 नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु करण्यात आला.

पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक अनंत अहिरे, हे.कॉ. प्रदीप राजपूत, हे.कॉ. प्रकाश चिंचोरे, पोलिस नाईक ज्ञानेश्वर कोळी, सोपान पाटील, जयेंद्रसिंग पाटील आदींचे पथक हल्लेखोर संशयीत आरोपींच्या मागावर निघाले.

तांत्रिक तपासाच्या मदतीने चोपडा तालुक्यातील नातेवाईक महिलेकडे हल्लेखोर संशयीत आरोपी आकाश कोळी हा त्याचा चुलत भाऊ चेतन कोळी याच्यासोबत पोलिसांच्या हाती लागला. अधिक तपासात चेतन कोळी याने आकाश कोळी यास पळून जाण्यास मदत केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे चेतन कोळी याला देखील संशयीत आरोपी करण्यात आले. क्रमाक्रमाने सर्व संशयीतांना अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment