बावीस लाखाच्या डिझेल चोरीचा गुन्हा उघडकीस 

On: February 17, 2026 9:35 PM

जळगाव – बावीस लाख रुपये किमतीच्या तीस हजार लिटर डिझेलची चोरी करणाऱ्या मुख्य चोरट्याच्या साथीदारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानातून शिताफीने अटक केली आहे. डिझेल चोरीच्या या घटनेतील सुत्रधार फरार होण्यात यशस्वी झाला आहे. मात्र त्याची कार पोलिस पथकाने तपास कामी ताब्यात घेतली आहे. तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास करून साथीदार चोरट्यास वाळवंटातून अटक करण्यात आली आहे. असलाराम भोमाराम असे अटक करण्यात आलेल्या साथीदार चोरट्याचे नाव आहे. डिझेल चोरी करून अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश या तपासातून झाला आहे. 

दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी एरंडोल-पारोळा रोडवरील हॉटेल आनंद परिसरात वाहन चालक भुराराम काळुराम याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने टँकर मधून डिझेल चोरी केली होती. ही चोरी लपवण्यासाठी चोरट्यांनी त्या टँकरचा अपघात झाल्याचा बनाव रचला होता. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गु.र.नं. 5/2026 अन्वये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा आंतरराज्य टोळीने केल्याचा संशय पोलीस पथकाला होता. त्यामुळे या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी तांत्रिक विश्लेषनासह बातमीदारांच्या मदतीने चोरट्यांचे राजस्थानातील लोकेशन शोधून काढले. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्यासह तपास पथक राजस्थानात गेले होते.

तपासा दरम्यान मुख्य सुत्रधार भुराराम काळूराम यास पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागली. त्यामुळे ताब्यातील चार चाकी वाहन रस्त्यात तसेच सोडून तो पसार होण्यात यशस्वी झाला. पोलिस पथकाने ती कार जप्त केली. ती कार त्याने गुन्ह्यातील पैशातून खरेदी केली असल्याची आणि गुन्ह्यासाठी वापरल्याचा पोलिसांना संशय आहे. वाळवंटातील निर्जन भागात मुख्य सुत्रधार चोरट्याच्या साथीदारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली.

डिझेल चोरट्यांनी कट रचून ही चोरी केली असून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता 2023 ची कलमे 61(2) (गुन्हेगारी कट) आणि कलम 303(2) (वाहतूक साधनातून चोरी) व वाहन अपघाताचा बनाव रचुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबाबत कलम 238 वाढवण्यात येणार आहेत.

या गुन्ह्याचा पुढील तपास एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शंकर पवार करत आहेत. अटकेतील चोरट्यास न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी या कामगिरीत सहभाग घेतला. त्यांना हे कॉ संदिप रमेश पाटील, हरिलाल लक्ष्मण पाटील, प्रविण जनार्दन मांडोळे, पोकॉ  राहल नथु कोळी, दिपक ज्ञानदेव चौधरी यांचे सहकार्य लाभले. तसेच तांत्रिक विश्लेषण कामी पोकॉ गौरव भगवान पाटील व मिलींद सिताराम जाधव यांनी विशेष सहकार्य केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment