जळगाव – लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला कार मध्ये बसवून जबरी चोरी करणाऱ्या चालकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारसह ताब्यात घेतले आहे. कार चालकाच्या इतर फरार साथीदारांचा शोध सुरु आहे.
दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास सलमान खान अमान उल्ला खान हे जळगावच्या अजिंठा चौफुलीवर निंभोरा येथे जाण्यासाठी बसची वाट बघत उभे होते. त्यावेळी अज्ञात चार इसम कारने त्यांच्याजवळ आले. तुम्हाला रावेर येथे सोडतो, शंभर रुपये भाडे लागेल असे त्यांना सांगण्यात आले. प्रवासी सलमान खान हे त्या कार मध्ये बसले. काही अंतर पुढे गेल्यावर सलमान खान यांच्या कमरेला चाकू लावून मागच्या सीटवर बसलेल्या इसमांनी त्यांचे हात पकडून ठेवले. त्यांच्या खिशातील नऊ हजार सातशे रुपये जबरीने काढून त्यांना खाली उतरवून देण्यात आले.
या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी बातमीदाराच्या मदतीने गुन्ह्यात वापरलेल्या कारचा नंबर निष्पन्न केला. कार चालक शंभू उर्फ पप्पू सुभाष पाटील (रा. केदार नगर पिंप्राळा) यास कारसह ताब्यात घेवून एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्या सोबत असलेल्या इतर साथीदारांची नावे निष्पन्न करण्यात आले असून ते रेकार्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ. विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, पोलिस नाइक किशोर पाटील, रवींद्र कापडणे, राहुल रगडे, छगन तायडे, प्रदिप चवरे आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद अली सैय्यद करत आहेत.






