रोटरी जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कार्यशाळेस सुरुवात

On: March 26, 2026 10:24 PM

वैजापूर(ता. चोपडा) – रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ बनविण्याच्या कार्यशाळेमुळे महिला सबलीकरणासोबतच उपजीविकेच्या अनेक संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आदिवासी विकास विभाग यावलचे सहायक प्रकल्पाधिकारी सतिश पाटील यांनी व्यक्त केली. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सरपंच दत्तर सिंग पावरा, वनरक्षक विजय शिरसाठ, प्रशिक्षक डाॅ. सतिश गोगुलवार, शालिनीताई, अध्यक्ष गिरीश कुळकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर, संवाद सचिव पंकज व्यवहारे, विद्याताई आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस मान्यवराचे हस्ते सुती अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रशांत सुर्यवंशी यांनी जीवन में कुछ करना है तो हिम्मत हारे मत बैठो… हे गीत सादर केले.

सरपंच दत्तर सिंग पावरा म्हणाले मोहफुलांचा उपयोग केवळ दारु बनविण्यासाठी माहिती होता मात्र रोटरी व गांधीतीर्थमुळे या नवीन पदार्थांची माहिती झाल्याचे सांगितले. वनरक्षक विजय शिरसाठ यांनी वनसंपदा आपल्यासाठी असून तिचा सुयोग्य कारणासाठी वाहावा. वनसंपदेच्या संवर्धन व मुल्यसंवर्धन याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता सांगितली. डाॅ. गोगुलवार यांनी आपण कार्यशाळेतून मिळालेले शिक्षण व्यवहारात उपयोगी आणावे असे आवाहन केले. आयोजकांनी महिलांनी निर्माण केलेल्या पदार्थांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे असेही आवाहन केले.

आज कार्यशाळेत मोहफुलांचा चिवडा, मोहफुलांचे लाडू व केक बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेस ३८ आदिवासी भगिनींनी सहभाग घेतला आहे. दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप शुक्रवार, दि. २७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सुर्यवंशी यांनी तर आभार सचिव सुभाष अमळनेरकर यांनी मानले. कार्यक्रमास चंद्रकांत चौधरी, अर्जुन प्रसाद, रौनक, सतिश चौरसिया, पायल, अश्विनी, राखी, अभिषेक, वैभव, रजत, जयश्री, आशिक, आयुष, राहुल, युवराज कोळी, बाळू बारेला आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment