जळगाव, दि. २८ (प्रतिनिधी) – : आदिवासी समाजाच्या पारंपरिक ज्ञानसंपदेचे आणि वनौषधींचे जतन करणे ही आजची अत्यंत गरजेचे असून मानवाने निसर्गाशी नातं टिकवून ठेवणे महत्त्वाचे असल्याचे मत गडचिरोली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य तज्ज्ञ डॉ. सतीश गोगुलवार यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. २७) गणपती नगर येथील रोटरी हॉलमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार हे तर सुभाष अमळनेरकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी उपस्थित होते.

डॉ. गोगुलवार यांनी आदिवासी संस्कृतीचे निसर्गाशी असलेले घट्ट नाते अधोरेखित करत मोहाच्या झाडाचे सामाजिक व आरोग्यदृष्ट्या महत्त्व सोदाहरण स्पष्ट केले. मोहफुलांमध्ये प्रथिने व जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असल्याने त्यांचे पोषणमूल्य उच्च असल्याचे त्यांनी सांगितले. मनुका, दूध आणि मोहफुल यांतील पोषकतत्त्वांचे तुलनात्मक विश्लेषणही त्यांनी सादर केले. त्यापासून अनेक आरोग्यदायी खाद्यपदार्थ बनविले जातात. त्यापासून प्रक्रिया उद्योग सुरू करून रोजगाराच्या नव्या संधी देखील उपलब्ध होऊ शकतात असे सांगितले. आदिवासी परंपरेतील ‘गोटूल’सारख्या शिक्षणपद्धतीतून जीवनमूल्ये आणि कौशल्ये विकसित होत असल्याचे सांगताना आधुनिक शिक्षणामुळे या परंपरांवर होणारा परिणाम त्यांनी अधोरेखित केला. यावेळी ‘प्लास्टिक वर्ज’चा संदेश देत पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आग्रह धरण्यात आला. यावेळी डॉ. गोगुलवार यांच्या पत्नीचा देखील त्यांच्या कार्यात सहभाग असतो. यावेळी मोहाच्या फुलांचे लाडू, बर्फी, चिवडा इत्यादी खाद्य पदार्थ देखील उपस्थितांना बघण्यासाठी ठेवण्यात आले होते.
डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनांची होणारी लूट आणि आदिवासींचे वाढते विस्थापन याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. नागरिकांनी स्वतःची जीवनशैली साधी व जबाबदार ठेवत नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या विचारांचा संदर्भ देत नैसर्गिक संसाधनांचा सामूहिक हक्क जपणे ही काळाची गरज असल्याचे देखील त्यांनी सांगितले. कार्यक्रमात डॉ. गोगुलवार यांच्या कार्याबाबत डॉ. प्रदीप जोशी यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले, तर त्याचे वाचन आदिती कुळकर्णी यांनी केले. यावेळी उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, सुबोध सराफ, मनोज गोविंदवार, देवयानी गोविंदवार, कॅप्टन मोहन कुळकर्णी, संदीप शर्मा, अशोक जोशी, कमलेश चांदवाणी, पुनम मानुधने, डॉ. क्षमा सराफ आदी मान्यवर उपस्थित होते.





