जळगाव – “आपले सरकार” या वेबसाईटवर अपलोड केलेली शैक्षणिक कागदपत्रे दुस-याच्या हाती गेल्याने त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता वर्तवण्यासह गोपनियतेचा भंग झाल्याप्रकरणी विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी नॉन क्रिमीलेयर दाखल्याची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी सेतु सुविधा केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या “आपले सरकार” या अधिकृत वेबसाईटवर 26 फेब्रुवारी 2026 रोजी आवश्यक कागदपत्रे अपलोड केली. त्यानंतर 13 मार्च रोजी सायंकाळी त्यांना तहसीलदार जळगाव यांच्या नावे एक मेल प्राप्त झाला. खोटे स्वयंघोषणापत्र देऊन तहसीलदार यांच्याकडून पन्नास हजार रुपये उत्पन्नाचा दाखला मिळवल्याप्रकरणी 18 मार्च रोजी सुनावणीकामी हजर राहण्याबाबत त्या मेलमधे नमुद होते.
दरम्यान आपल्या पाल्यांच्या नॉन क्रिमीलेयर बाबत त्यांनी सेतू सुविधा केंद्रात चौकशी केली असता संबंधीत अर्ज प्रक्रियेत असल्याचे त्यांना समजले. तसेच सुनावणी प्रकरणी गुप्ता यांनी संबंधीत कागदपत्रांच्या प्रमाणीत प्रती मागवल्या. त्या दस्तावेजामधे त्यांना आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती देखील आढळून आल्या. हा प्रकार त्यांनी आपल्या मुलीच्या निदर्शनास आणून दिला.
शासनाच्या अधिकृत वेब साईटवर दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10.20 वाजता शैक्षणीक कागदपत्रे अपलोड केली असतांना ती शैलेंद्र सपकाळे नामक व्यक्तीकडे काही तासात 27 फेब्रुवारी रोजी गेल्याचे गुप्ता व त्यांची मुलगी या दोघांच्या लक्षात आले. आपल्या कागदपत्रांचा भविष्यात गैरवापर होण्याची दाट शक्यता गुप्ता व त्यांच्या मुलीने वर्तवली आहे. कुणाच्या गोपनीय अथवा सार्वजनीक कागदपत्रांची शासकीय कार्यालयातून सही शिक्क्यांसह प्रमाणित माहिती घेण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा वापर करावा लागतो. याप्रकरणी गुप्ता यांच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव सायबर पोलिस स्टेशनला शैलेंद्र सपकाळे नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








