जळगाव – पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अतिशय तत्परतेने कारवाई करत दोन चोरीचे गुन्हे अवघ्या तीन तासांत उघडकीस आणले असून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
नय्युम जहांगिर देशमुख (रा. अक्सानगर, जारगाव, ता. पाचोरा) यांच्या गोडाऊनमधून 94,500 रुपये किंमतीचे गोदरेज कंपनीचे तीन ए.सी. अज्ञात चोरट्यांनी 1 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 दरम्यान चोरून नेले होते. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. 177/2026, भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेत जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी रिहान हमीश शहा (वय 22, रा. हनुमाननगर, पाचोरा) यास ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेले तीन ए.सी. हस्तगत करण्यात आले.
दरम्यान, याच काळात नोंद झालेल्या दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यात (गुन्हा रजि. नं. 174/2026) सुमारे 30,000 रुपये किमतीची सोन्याची पोत चोरीचाही गुन्हा उघडकीस आणत संबंधित मुद्देमालही जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे दोन्ही गुन्ह्यांतील पूर्ण मुद्देमाल अवघ्या तीन तासांत हस्तगत करण्यात आला. या कामगिरीबद्दल संबंधित फिर्यादी तसेच परिसरातील नागरिकांनी पोलीस दलाचे कौतुक करत कर्तव्यदक्षतेबद्दल आभार व्यक्त केले. या कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी वेळेवर कारवाई करत गुन्हेगारांवर प्रभावी वचक बसवला आहे.








