जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरातून चोरीस गेलेल्या अँपे रिक्षा प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशन यांनी तत्पर कारवाई करत आरोपीस अटक केली असून चोरीची रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सिव्हील हॉस्पिटलच्या गेट क्रमांक तीन येथील पार्किंगमधून MH19 BJ 4025 क्रमांकाची तीनचाकी अँपे रिक्षा चोरीस गेली होती. याप्रकरणी दुसऱ्या दिवशी, दि. १३ एप्रिल रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी कल्पेश ज्ञानेश्वर इंगळे (वय ३२) याचा शोध घेतला. तो रामेश्वर कॉलनी, मेहरूण (जळगाव) येथील रहिवासी असून मूळगाव तोंदे, ता. शिरपूर, जि. धुळे असल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना पांडे डेअरी चौकातील वीज मंडळ कार्यालयाजवळ संशयित रिक्षा आढळून आली. पोलिसांनी रिक्षा थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपली ओळख कल्पेश इंगळे अशी सांगितली. अधिक चौकशीत त्याने सिव्हील हॉस्पिटल परिसरातून सदर रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून अंदाजे ७५,००० रुपये किमतीची काळ्या-पिवळ्या रंगाची अँपे रिक्षा जप्त केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोना कमलेश पवार करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोह मिलिंद सोनवणे, कमलेश पवार, तुषार पाटील, गोविंद साबळे, नरेंद्र दिवेकर व प्रविण जाधव यांनी सहभाग घेतला.








