जळगाव जिल्ह्यातील मोठी कारवाई : गॅस सिलेंडर चोरी प्रकरणी तिघे अटकेत, ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त

On: April 29, 2026 4:24 PM

जळगाव : फैजपूर व वरणगाव परिसरात घडलेल्या गॅस सिलेंडर चोरीच्या दोन गंभीर गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत तिघा आरोपींना अटक केली असून सुमारे ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २५ एप्रिल २०२६ रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात ललित रघुनाथ राणे (वय ५८), संचालक श्रीधर गॅस एजन्सी, यांनी फिर्याद दिली होती. अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश करत भारत गॅस कंपनीचे १४.२ किलो वजनाचे भरलेले १०० सिलेंडर, एकूण ३ लाख ११ हजार ८०० रुपयांचा माल चोरून नेला होता.

तसेच, दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी वरणगाव पोलीस ठाण्यात नरेंद्र उत्तमराव अहिर (वय ५१) यांनीही अशीच फिर्याद नोंदवली होती. त्यांच्या गोडाऊनमधून ७२ हजार ८४६ रुपयांचे ५७ गॅस सिलेंडर चोरीला गेले होते. या दोन्ही गुन्ह्यांची नोंद भारतीय न्याय संहिता कलमांनुसार करण्यात आली होती.

या गंभीर प्रकरणांचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण, सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित वाहनांचा मागोवा घेण्यात आला.

या तपासातून शेख विलाल शेख नवी (वय ३२, रा. कासोदा, ता. एरंडोल), वसीम खान शाबीर खान (वय ३१, रा. तांबापुरा, जळगाव) आणि चेतन सुरेश काळे (वय ३८, रा. नशिराबाद, ता. भुसावळ) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी दोन्ही गुन्हे इतर साथीदारांसह केल्याची कबुली दिली.

चोरट्यांकडून भरलेले ६२ गॅस सिलेंडर, ९५ रिकामे सिलेंडर आणि सुझुकी कंपनीची बर्गमन मोपेड असा एकूण ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटकेतील सिलेंडर चोरट्यांना फैजपूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद व विनोद गाभणे करीत आहेत. या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर व केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सोपान गोरे, पो.हे.कॉ. प्रितम पाटील, प्रेमचंद सपकाळे, सलीम तडवी, उमाकांत पाटील, यशंवत टहाकळे, पो.ना श्रीकृष्ण देशमुख आणि पोलिस अंमलदार बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयुर निकम, गौरव पाटील, मिलींद जाधव आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment