कर्तव्यदक्ष हे.कॉ. किरण धमके यांची उल्लेखनीय कारकीर्द – २७ वर्षांत २५६ बक्षिसांनी गौरव

On: April 30, 2026 3:35 PM

जळगाव : पोलीस दलात कर्तव्यनिष्ठा, धाडस आणि प्रामाणिक सेवेमुळे वेगळी ओळख निर्माण करणारे पोलिस हेड कॉन्स्टेबल किरण निंबालाल धमके यांची कारकीर्द अनेक उल्लेखनीय कामगिरींनी समृद्ध ठरली आहे. २२ मार्च १९९९ रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलात भरती झाल्यानंतर त्यांनी अतिदुर्गम भागात कार्य करत आपल्या कर्तव्याची  छाप उमटवली. सन २०१० मध्ये त्यांची बदली जळगाव जिल्हा पोलीस दलात झाली. त्यानंतर त्यांची धाडसी कारकिर्द बहरत गेली व त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. उद्या महाराष्ट्र दिनी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला जात आहे. समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद पोलीस ठाण्यात कार्यरत असताना २००६ मध्ये नक्षल गुन्ह्यातील फरार आरोपी सुरेश खडे याला पकडण्यात त्यांनी पोलिस पथकासोबत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच वर्षी नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यावेळी बंदोबस्ताची जबाबदारीही त्यांनी प्रभावीपणे पार पाडली. मोटारसायकल अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करून त्यांचे प्राण वाचवण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. तसेच २००८ मध्ये तंटामुक्ती मोहिमेदरम्यान शहादा येथील लोकन्यायालयात अनेक वाद मिटवण्याकामी त्यांनी उल्लेखनीय मदत केली.

धरणगाव पोलीस ठाण्यांतर्गत पाळधी येथे क्राईम रायटर म्हणून काम करताना त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासात मोलाची मदत केली. त्यांच्या सहकार्यामुळे खून, बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना न्यायालयाने जन्मठेप तसेच कारावासाच्या शिक्षा सुनावल्या.

गेल्या पाच वर्षांपासून ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, जळगाव येथे कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. गणेशोत्सव विसर्जन आणि ईद-ए-मिलाद मिरवणुकीच्या बंदोबस्तात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना प्रशंसापत्राने सन्मानित करण्यात आले आहे. पोलीस दलातील २७ वर्षांच्या सेवाकाळात किरण धमके यांना तब्बल २५६ बक्षिसे मिळाली असून त्यांच्या कार्याची हीच मोठी पावती मानली जात आहे. त्यांच्या कर्तव्यदक्ष आणि समर्पित सेवेमुळे ते पोलीस दलासाठी प्रेरणादायी ठरले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment