मद्यपी पतीच्या त्रासाला मनिषा वैतागली फार — दोरीने दिला गळफास, केला कायमचा गार

On: May 11, 2026 4:55 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): भारतीय स्त्रीयांची अनेक रुपे आपणास बघण्यास मिळतात. मुलगी, पत्नी आणि माता ही स्त्रीची तीन प्रमुख रुपे आहेत. मात्र प्रसंगी प्राण देणारी आणि प्रसंगानुरुप प्राण घेणारी देखील स्त्री असते. ज्यावेळी एखादी स्त्री रणचंडीकेचे रुप धारण करते त्यावेळी ती कुणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. आपल्या बाळाला दुग्धप्राशन करण्यासाठी आतुर झालेल्या हिरकणी नावाच्या मातेने जोखीम पत्करुन रायगडाचा बुरुज पार केल्याची कथा सर्वशृत आहेच. या कथेतून स्त्रीच्या ममत्वाचे उदाहरण देता येते. बाळाला पोटाशी धरुन शत्रुसोबत दोन हात करणारी झाशीची राणी देखील सर्वश्रृत आहेच. रणरागीणी मर्दाणीच्या रुपातील स्त्री म्हणून झाशीच्या राणीचे उदाहरण दिले जाते. आपल्या पतीचा कुणी अपमान केल्यास समोरच्या व्यक्तीला प्रसंगी खडे बोल सुनावणारी देखील स्त्री असते. मात्र आपल्याच पतीचे एखाद्या परस्त्रीसोबत संबंध असल्याचे समजल्यानंतर त्याला खडे बोल सुनावणारी देखील स्त्रीच असते.

नुकत्याच काही दिवसांपुर्वी मुंबईच्या ट्राफीक जाम मधे अडकलेल्या एका मातेचे रौद्र रुप जगाला बघण्यास मिळाले. आपल्या बाळाला घेण्यासाठी जाणा-या  ट्राफीक जाममधे फसलेल्या या महिलेने मंत्र्यांना खडे बोल सुनावत रणरागीणीचे रुप जगाला दाखवून दिले. जळगाव शहरात एका स्त्रीने मद्यपी पतीच्या त्रासाला वैतागून त्याची दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. जळगाव शहरात घडलेली ही घटना केवळ एक खून नव्हती……. तर ती होती तुटलेल्या नात्यांची, व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या आयुष्याची आणि समाजाच्या दुर्लक्षाची भयानक परिणीती.

जळगाव शहरातील ही कथा आहे भरत नामदेव पाटील आणि मनीषा पाटील या दाम्पत्याच्या संसाराची……. एक असा संसार, जो सुरुवातीला प्रेम, विश्वास आणि स्वप्नांनी भरलेला होता. पण काळ पुढे सरकत गेला आणि या घरात आनंदाऐवजी भीती, अपमान आणि हिंसाचाराने जागा घेतली.

मनीषा पाटील (संशयित आरोपी)

भरत पाटील आणि मनिषा पाटील यांचा संसार तसा व्यवस्थित सुरु होता. मात्र का कुणास ठाऊक भरत पाटील यास मद्यपानाचे व्यसन जडले आणि तेथून सुरु झाली दोघांच्या संसाराची वाताहत. सुरुवातीला मित्रांसोबत अधूनमधून घेतली जाणारी दारु हळूहळू भरतच्या आयुष्याचा एक भाग बनली. त्याचे व्यसन दिवसागणिक वाढतच गेले… आणि त्याचबरोबर बदलत गेला त्याचा स्वभाव. घरात रोज भांडणे सुरु झाली. दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नी मनिषाला शिवीगाळ करणे, मारहाण करणे, मुलांसमोर तिचा अपमान करणे हा रोजचा प्रकार झाला.

मनीषा हा प्रकार अनेकदा सहन करत होती. भारतीय स्त्रीला लहानपणापासून एकच शिकवलं जातं ते म्हणजे “संसार टिकवायचा असतो.” ती आपल्या मुलांच्या भविष्यासाठी गप्प होती. समाज काय म्हणेल, या भीतीपोटी तिने मनातील अनेक जखमा लपवल्या. मद्याच्या आहारी गेलेल्या भरतने तो रहात असलेले स्व मालकीचे घर देखील विक्रीला काढले. तो रहात असलेल्या घराच्या कर्जाचे हप्ते तो वेळेवर भरु शकत नव्हता. त्यामुळे विक्रीस काढलेल्या घराच्या विषयावरुन घरात पती पत्नीत नेहमी वाद होत असत. आपल्या आई बापाचा हा वाद दोन्ही मुले मुकाट्याने बघत होते. त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता.

श्रीकांत धीवरे पोलिस अधीक्षक जळगाव

मद्याच्या आहारी गेलेल्या भरत पाटील याने त्याचे राहते घर शेजारी राहणा-या व्यक्तीस 19 लाख 50 हजार रुपयात विक्री केले. बॅंकेच्या थकीत हप्त्यापोटी खरेदीदाराने 14 लाख रुपये बॅंकेत जमा करुन उर्वरीत साडे पाच लाख रुपये भरत पाटील यास दिले. 6 मे 2026 रोजी विक्री केलेले राहते घर सोडून भरत पाटील परिवारासह भाड्याच्या घरात राहण्यास जाणार होता. तसे नियोजन सुरु झाले होते. मात्र स्वमालकीचे घर विक्री करण्याची नामुष्की आल्यामुळे मनिषाच्या मनात विचारांचे युद्ध सुरु होते. तिच्या मनात विचारांची कालवाकालव सुरु होती. आपले स्वमालकीचे घर सोडून जाण्याची तिची मुळीच इच्छा नव्हती. मात्र दारुड्या पतीच्या कर्जबाजारीपणामुळे तिच्यावर स्वत:चे घर सोडून भाड्याच्या घरात जाण्याची वेळ आली होती. या कारणावरुन दोघा पती पत्नीत कडाक्याचा वाद सुरु झाला. 

भरतने त्याची पत्नी मनिषाला मारहाण करण्यास सुरुवात केली. राग, भीती, अपमान आणि वर्षानुवर्षे साचलेली वेदना… या सगळ्यांचा त्या रात्री स्फोट झाला. घरात पडलेली दोरी मनीषाच्या हातात आली. क्षणभर तिच्या डोळ्यांसमोर मुलांचे रडणे, स्वतःवर झालेले अत्याचार, आणि रोजच्या नरकमय जीवनाची चित्रे चमकून गेली. आणि पुढच्या काही क्षणांत…तिने भरतच्या गळ्याभोवती दोरी आवळली. गळा आवळलेल्या दोरी ओढल्याने भरत जमीनीवर कोसळला. जमीनीवर आपटलेल्या भरतच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. एका क्षणात घरात शांतता पसरली. पण ती शांतता भयानक होती. क्षणभर मनीषालाही विश्वास बसत नव्हता की तिच्या हातून इतकं मोठं कृत्य घडलं आहे.

रक्ताने माखलेला भरतचा शर्ट आणि गळा आवळण्यासाठी वापरण्यात आलेली दोरी मनिषाने जवळच असलेल्या उकीरड्यावर फेकून दिली. काही वेळाने रडारड सुरु झाली. अती मद्यपानामुळे भरतचा मृत्यु झाल्याची आवई परिसरात पसरली. परिसरात राहणा-या एका तरुणाने भरत यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. इरफान फारुकी यांनी तपासणीअंती  भरत पाटील यास मयत घोषित केले. डॉ. फारुकी यांनी दिलेल्या  खबरीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला 14/2026 या क्रमांकाने  अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या अकस्मात मृत्युचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्याकडे देण्यात आला.

या अकस्मात मृत्यूच्या पंचनाम्यादरम्यान मयत भरतच्या कानातून झालेला रक्तस्त्राव आणी गळ्यावरील संशयास्पद काळसर वर्तुळाकार व्रण पोलिस अधिका-यांना आढळून आला. त्यामुळे त्याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. भरतचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे तपासाची दिशा बदलली.

पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपासाला गती देण्यात आली. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी मयत भरतची पत्नी मनीषाची चौकशी सुरु केली. सुरुवातीला ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. तपास अधिक खोलात जावू लागला. संबंधीताचे जवाब घेण्याचे काम सुरु झाले. अनेकांनी घरातील रोजच्या भांडणांविषयी माहिती दिली. काहींनी मारहाणीचे प्रकार पाहिल्याचे सांगितले.

पोलिसांनी घराजवळच पडलेल्या उकिरड्यातून गुन्ह्यात वापरलेली दोरी व  रक्ताने माखलेला भरतचा शर्ट जप्त केला. फॉरेन्सिक तपास सुरु झाला. घटनास्थळावरील परिस्थिती, फॉरेन्सिक अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल, संबंधिताचे जवाब यांची एकमेकांशी सांगड जुळू लागली.

तपास जसजसा तीव्र होत गेला तसतशी मनिषाची मानसिक स्थिती खचू लागली. शेवटी पोलिसांच्या कठोर चौकशीत तीचा मानसिक तोल ढळला. डोळ्यात अश्रू आणत तिने कबुली दिली. “मी कंटाळले होते… रोज मरत होते… त्या रात्री माझा संयम संपला.” ही कबुली ऐकून पोलिसही काही क्षण शांत झाले. कारण त्यांच्या समोर फक्त आरोपी नव्हती… तर संसारातून तुटलेली एक स्त्री उभी होती. मात्र कायद्याच्या दृष्टीने खून हा खूनच असतो. पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तिला अटक करण्यात आली.

ही घटना समाजासाठी अनेक प्रश्न निर्माण करून जाते. दारुचे व्यसन फक्त एका व्यसनी व्यक्तीला नष्ट करत नाही तर ते संपूर्ण कुटुंबाला उध्वस्त करते. घरगुती हिंसाचार हा “घरातील विषय” नसून गंभीर सामाजिक समस्या आहे. अनेक स्त्रिया आजही समाजाच्या भीतीने अत्याचार सहन करत राहतात.

जर मनिषाचे वेळेवर समुपदेशन झाले असते…जर कुटुंबाने हस्तक्षेप केला असता…जर समाजाने “सहन कर” ऐवजी “मदत घे” असे सांगितले असते…तर कदाचित एक जीव वाचला असता आणि एक स्त्री गुन्हेगार बनली नसती. ही कथा केवळ एका खुनाची नाही. ही कथा आहे — मानवी सहनशीलतेच्या अंताची, व्यसनामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची आणि समाजाने वेळेत लक्ष न दिल्यास निर्माण होणाऱ्या भीषण परिणामांची. कारण कधी कधी…गुन्हा एका क्षणात घडतो, पण त्यामागे वर्षानुवर्षे साचलेली वेदना दडलेली असते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment