जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : त्या रात्री जळगावच्या शासकीय रुग्णालयात एक तरुण मृत्यूशी झुंज देत होता. त्याच्या छातीत खोलवर घुसलेला चाकू डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आला. बाहेर पोलिसांची लगबग सुरू होती. घटनास्थळावरील पुरावे गोळा केले जात होते. काही तासांपूर्वी मित्रांसोबत पार्टी करणारा राहुल वाघोदे आता जीवन-मरणाच्या सीमारेषेवर झुंज देत होता. पण प्रश्न होता…राहुलच्या छातीत चाकू कोणी खुपसला? आणि त्याहून मोठा प्रश्न…या रक्तरंजित घटनेमागे नेमके कोणते काळे सत्य दडले होते?

एका मुलीची हरवलेली वाट ……
करिना (काल्पनिक नाव) अजून अल्पवयीन होती. गरिबीने तिचे बालपण हिरावून घेतले होते. पोटाची खळगी भरण्यासाठी ती रस्त्यावर भिक्षा मागत असे. अशाच काळात तिची ओळख एका महिलेशी झाली. “काम देते” या आश्वासनाने तिला एका घरात नेण्यात आले. पण ते घर रोजगाराचे नव्हते, तर यौन शोषणाचे केंद्र होते. काही दिवसांतच करिना वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ओढली गेली.
सुरुवातीला जगण्यासाठी सुरू झालेला प्रवास हळूहळू तिची सवय बनला. पैशाची चटक, चुकीची संगत आणि समाजापासून दूर जात असलेले आयुष्य…… यामुळे ती त्या चुकीच्या जगात आणि दुष्टचक्रात अडकत गेली. याच काळात तिची भेट झाली सुमित लोखंडेशी.

एक घर… अनेक रहस्ये …..
सुमितचे घर बाहेरून सामान्य दिसत होते. पण स्थानिक पातळीवरील चर्चांनुसार त्या घरात वेगळ्याच गोष्टी घडत होत्या. वेगवेगळ्या महिला आणि मुलींची ये-जा. रात्रभर सुरू असणाऱ्या पार्ट्या….. मद्य आणि नशेच्या पदार्थांचे सेवन…… इंजेक्शन, गोळ्या आणि इतर अमली पदार्थांचा वापर. राहुल रहात असलेले हे घर हळूहळू व्यसन, अनैतिक व्यवहार आणि बेफिकीर जीवनशैलीचे केंद्र बनले होते. करिनाला देखील हे वातावरण आवडू लागले. ती सुमितसोबत तेथे राहू लागली.
आईचा संघर्ष ……
आपली मुलगी चुकीच्या मार्गाला लागल्याचे करिनाच्या आईच्या लक्षात आले होते. तिने तिला अनेकदा समजावले. ती माय माऊली रडली. तिने करिनाला विनवण्या केल्या. शेवटी मुलीला त्या वातावरणातून दूर नेण्यासाठी तिने तिचे लग्न दुसऱ्या राज्यातील तरुणाशी लावून दिले.


आईला वाटले…आता मुलीचे आयुष्य मार्गी लागेल. पण तसे झाले नाही. अवघ्या एका महिन्यात करिना पुन्हा जळगावला पळून आली. आणि पुन्हा त्याच घरात. त्याच लोकांमध्ये. त्याच दलदलीत. रंगीले मित्र आणि वाढती बेफिकिरी.
सुमित लोखंडे, राहुल वाघोदे, हर्षल घुगे आणि नितीन सैनी. ही चौकडी परिसरात ओळखली जात होती. मद्यपान, मौजमजा आणि बेजबाबदार जीवनशैली हे त्यांचे वैशिष्ट्य बनले होते. १ जून २०२६ रोजी त्यांनी एकत्र जेवणाचा कार्यक्रम आखला. मात्र कोणालाही कल्पना नव्हती की हा दिवस त्यांच्यातील एकासाठी अखेरचा ठरणार आहे.


कोल्हे हिल्स परिसरातील पार्टी…..
दुपारच्या सुमारास सर्वजण कोल्हे हिल्स परिसरातील एका निर्जन टेकडीवर गेले. तेथे भरपूर मद्यपान झाले. विशेषतः राहुलने बेतापेक्षा अधिक मद्यपान केले. संध्याकाळपर्यंत त्याची नशा नियंत्रणाबाहेर गेली होती. भान हरपलेल्या अवस्थेत सर्वजण सुमितच्या घरी परतले. आणि तिथून सुरू झाला वादाचा पहिला अंक.
नशा, वासना आणि संताप …..
राहुलने करिनाशी गैरवर्तन सुरू केल्याचा आरोप आहे. अश्लील टिप्पणी. शारीरिक जवळीक साधण्याचा आणि लगट करण्याचा प्रयत्न. राहुलने करिनासोबत वारंवार छेडछाड केल्यामुळे ती संतापली. तिच्या पाठोपाठ तिचा मित्र सुमित देखील संतापला. आणि घरातील वातावरण क्षणात तापले. शब्दांचे वार झाले. त्यानंतर हातघाई सुरू झाली. धक्काबुक्की, शिवीगाळ, मारहाण….. सर्व काही काही मिनिटांत घडत होते. आणि मग उचलला गेला चाकू…


प्राप्त माहितीनुसार, झटापटीदरम्यान सुमितकडे असलेला चाकू करिनाच्या हाती आला आणि रागाने विवेकावर मात केली. क्षणभरासाठी कुणाच्याच डोक्यात परिणामांचा विचार नव्हता. पुढच्याच क्षणी राहुलच्या छातीत आणि पोटात चाकू खुपसला गेला.
एक…दोन…आणि सर्व काही संपले. राहुल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याच्या शरीरात चाकू अडकून राहिला. उपस्थितांनी प्रयत्न केले. मात्र चाकू बाहेर निघत नव्हता. घटना गंभीर वळण घेत असल्याचे लक्षात येताच करिना आणि सुमित घटनास्थळावरुन पळून गेले. राहुलला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. राहुलच्या पोटातील चाकू बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले पण अखेरीस राहुलची मृत्यूशी सुरू असलेली लढाई संपली.


या घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळासह शासकीय रुग्णालयात दाखल झाले. सुरुवातीला राहुलवरील हल्ल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचे स्वरुप त्याच्या मृत्यूनंतर बदलले. हल्ल्याचा गुन्हा आता खूनात परिवर्तित झाला होता.
राहुलचा मृत्यू झाल्याचे समजताच फरार करिना आणि सुमित या दोघा संशयीत आरोपींनी वेगवेगळ्या दिशांना पलायन केले. सुमित सुरतला तर करिना भोपाळला पळून गेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. तपासाचे चक्र वेगाने फिरू लागले.


या खुनामागील खरे आरोपी कोण? कायद्याच्या दृष्टीने आरोपी अथवा संशयीत आरोपी नक्कीच निश्चित असतील. पण सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले तर या घटनेमागे आणखी काही आरोपी आहेत. गरिबी, व्यसनाधीनता, वेश्या व्यवसायाचे जाळे, अल्पवयीन मुलींचे शोषण, बिघडलेली संगत आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास हेच ते सर्व आरोपी आहेत. हे सर्व घटक मिळून या खूनाची पार्श्वभूमी तयार करत होते.
राहुलचा मृत्यू एका चाकूच्या वाराने झाला. पण त्या वाराची धार अनेक वर्षांपासून तयार होत होती. आज अनेक तरुण “मजा”, “स्टेटस” आणि “स्वातंत्र्य” या नावाखाली व्यसनांच्या विळख्यात अडकत आहेत. अनेक मुली आर्थिक विवंचनेमुळे शोषणाच्या जाळ्यात अडकत आहेत. कुटुंबांतील संवाद कमी होत आहे. आणि समाजातील संवेदनशीलता हरवत चालली आहे.


या प्रकरणातून एकच धडा मिळतो—नशा कधीच समस्या संपवत नाही तर ती नवीन समस्या निर्माण करते. चुकीची संगत आयुष्य उद्ध्वस्त करते. क्षणिक राग आयुष्यभराची शिक्षा ठरू शकतो. कारण गुन्हा घडतो त्या क्षणी नव्हे…त्याची सुरुवात अनेकदा त्याआधीच्या चुकीच्या निर्णयांपासून झालेली असते. जळगाव शहराच्या उपनगरातल्या एका साध्या घरात घडलेली ही घटना केवळ खुनाची नाही, तर समाजातील अनेक गंभीर प्रश्नांवर बोट ठेवणारी आहे. नशेच्या विळख्यात अडकलेली तरुणाई, वेश्या व्यवसायाचे वाढते जाळे आणि क्षणिक रागातून घडणारे भीषण गुन्हे यांचा हा काळा आरसा आहे.
हर्षल घुगे या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार राहुलने मद्याच्या नशेत घरासमोरच लघुशंका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आधीच संतापलेल्या करिनाचा संयम सुटला. शिवीगाळ, आरडाओरड आणि मारहाण सुरू झाली.
या संपूर्ण घटनेकडे पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—हा खून एका दिवसात घडलेला नाही. त्याची बीजे अनेक वर्षांपूर्वी पेरली गेली होती. गरिबी, चुकीची संगत, वेश्या व्यवसाय, व्यसनाधीनता आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास यांची साखळी अखेरीस एका तरुणाच्या मृत्यूवर येऊन थांबली. ही घटना केवळ एका खुनाची कथा नाही. ही प्रत्येक पालक, युवक आणि समाजासाठी धोक्याची घंटा आहे.
व्यसन कधीच मनोरंजन नसते. ते हळूहळू माणसाचा विवेक हिरावून घेते. चुकीची संगत आयुष्याची दिशा बदलते. अल्पवयीन मुली आणि मुलांना गुन्हेगारी जाळ्यात ओढणाऱ्या टोळ्यांविरुद्ध समाजाने सजग राहणे आवश्यक आहे.
एखाद्या क्षणाच्या रागात उचललेले शस्त्र केवळ एका व्यक्तीचा जीव घेत नाही, तर अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करते. म्हणूनच तरुणांनी नशा, हिंसा आणि अनैतिक मार्गापासून दूर राहून शिक्षण, रोजगार आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा स्वीकार करणे हीच काळाची गरज आहे. कारण चुकीच्या वाटेची सुरुवात अनेकदा छोटी असते. पण तिचा शेवट बहुतेकदा रक्तरंजितच असतो. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अप्पर पोलिस अधिक्षक संदिप्प गावीत, डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील व त्यांचे सहकारी करत आहेत. याकामी त्यांचे सहकारी हे.कॉ. प्रदीप राजपूत, हे.कॉ. योगेश पाटील, हे.कॉ. अविनाश देवरे, पोलिस नाईक कैलास इंगळे, महिला पोलिस कर्मचारी योगिता पाचपांडे, पो.कॉ. गणेश पाटील, पो.कॉ. प्रशांत ठाकुर, पो.कॉ तुषार जोशी यांचे सहकार्य लाभत आहे.







