जळगाव – नशिराबाद भाग जळगाव येथील मंडळ अधिकारी मिलींद देवरे यांच्या सांगण्यावरुन पन्नास हजार रुपयांची लाच स्विकारणा-या खासगी इसमास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईने जळगाव महसुल विभागात खळबळ माजली आहे. मंडळ अधिकारी मिलींद देवरे आणि खासगी इसम सुरेंद्र प्रल्हाद अहिरे या दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराविरुद्ध संबंधित स्थानिक रहिवाशांनी ते शेतात अवैधरित्या खोदकाम करत असल्याच्या महसुलसह इतर ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची चौकशी बंद करण्याकामी मिलींद देवरे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती पन्नास हजार रुपये स्विकारण्याचे देवरे यांनी मान्य केले होते.
या प्रकरणी तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरण्याच्या पडताळणीअंती मिलींद देवरे यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम सुरेंद्र अहिरे या खासगी इसमाकडे देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले. पिंप्राळा तलाठी कार्यालयाच्या बाहेर लावलेल्या सापळ्यात अहिरे हा इसम लाचेची पन्नास हजार रुपयांची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पथकाला सापडला. त्याला जागीच पकडण्यात आले. नाशिक एसीबीचे सापळा अधिकारी राहुलकुमार नाईक यांच्यासह हवालदार प्रफुल्ल माळी, विलास निकम यांनी या कारवाईत सहभाग घेतला. अधिक तपास जळगाव एसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत नागरे करत आहेत.







