जळगाव : जिल्ह्यात अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने धरणगाव पोलीस स्टेशनकडून करण्यात आलेल्या कारवाईत गावठी बनावटीच्या पिस्तुलासह एकाला अटक करण्यात आली आहे.
धरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनील पवार यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांना अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दि. 14 मे 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते हे आपल्या पथकासह दोणगाव परिसरातील गिरणा नदीपात्रात अवैध रेती वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते.
यावेळी गिरणा नदीपात्रात एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिस पथकाने त्याची चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तसेच त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून 25 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे मॅगझीनसह एक पिस्तूल जप्त करण्यात आले.
पोलिसांनी आनंद बळीराम सपकाळे याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडजुजर करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर, पो. कॉ. गजानन बारस्कर, पो. कॉ. सचिन चौधरी, पो. कॉ. विशाल पाटील आदींचा सहभाग होता.





