नवविवाहित तरुणाची आत्महत्या – पत्नीसह तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल

On: May 21, 2026 10:02 AM

जळगाव : लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसात नवविवाहित तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यात उघडकीस आली आहे. पत्नीचे विवाहपूर्व प्रेमसंबंध आणि लग्नानंतरही तिचा प्रियकरासोबत सुरू असलेला संपर्क सुरुच असल्यामुळे नवविवाहीत तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आत्महत्या करणा-या तरुणाच्या पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल युवराज पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील तरुणाचा काही दिवसांपूर्वी विवाह झाला होता. मात्र विवाहापूर्वी त्याच्या पत्नीचे विशाल युवराज पाटील याच्याशी प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही दोघांमध्ये मोबाईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत संपर्क सुरू होता. प्रियकराकडून नव विवाहीत तरुणाला धमक्या दिल्या जात होत्या. त्यामुळे तो तणावाखाली असल्याची माहिती पुढे आली आहे.

१९ मे रोजी संबंधित तरुणाने गावालगतच्या एका शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. मृत तरुणाच्या घरातून पोलिसांना एक चिठ्ठीही मिळाली असून त्यात आत्महत्येमागील कारणांचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी मृत तरुणाच्या बहिणीने यावल पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पत्नी व तिचा प्रियकर विशाल पाटील यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. मुख्य आरोपी विशाल पाटील याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला २२ मेपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास  प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार वसंतकुमार बेलदार करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment