शापित असल्याचे सांगत जमीन लाटली भोंदू दाम्पत्याने

On: May 27, 2026 1:29 PM

नाशिक – गुरुवचनाच्या आहारी गेलेल्या दोन भावांना भोंदू बाबा आणि त्याच्या पत्नीने तब्बल 18 लाख रुपयांचा गंडा घालत दोन एकर जमीन आपल्या नावावर करून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नाशिक येथील आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीच्या आधारे भोंदू कमलेश भगवान देवकर (रा. तकळखेडा, ता. मालेगाव, जि. नाशिक) आणि त्याची पत्नी गौरी कमलेश देवकर (रा. समर्थनगर, चरण आनंद सोसायटी, पाथर्डी फाटा, नाशिक) यांनी दोन भावांना त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू हा “भूतबाधा” आणि “शाप” यामुळे झाल्याचे सांगून मानसिकरीत्या जाळ्यात ओढले.

त्यानंतर दोघांना विविध धार्मिक विधी, तंत्र-मंत्र, पूजा आणि आश्रमातील कार्यक्रमांच्या नावाखाली सतत संपर्कात ठेवण्यात आले. “तुमच्या कुटुंबावर संकट आहे, देव रागावले आहेत,” अशी भीती दाखवत दोघांवर मानसिक नियंत्रण मिळवण्यात आले.

आरोपींनी पीडितांना त्यांच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारापासून दूर ठेवले. मोबाईलवर संपर्क तोडण्यास भाग पाडले. आश्रमात बोलावून “विशेष पूजा” आणि “अघोरी साधना” करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यात आले.

इतकेच नव्हे तर, “जमीन शापित आहे, ती आमच्या ट्रस्टच्या नावावर केल्यास संकट दूर होईल,” असे सांगत दोन्ही भावांकडून सुमारे दोन एकर जमीन स्वतःच्या ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. या व्यवहाराची किंमत सुमारे 18 लाख रुपये असल्याची सांगितली जात आहे. या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर आडगाव पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment