जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन परिसरात पडून असलेल्या बेवारस दुचाकी वाहनांबाबत पोलिस प्रशासनाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पोलिस स्टेशन परिसरात पडून असलेल्या दहा बेवारस दुचाकी वाहनांच्या मालकांनी ओळख पटवून आपली वाहने घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाने त्यांच्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करुनही या वाहन मालकांची ओळख पटलेली नाही. तसेच कुणीही वाहनधारक या वाहनांवर मालकी हक्क दाखवण्यासाठी पुढे आलेला नाही.
अनेक वर्षांपासून पडून असलेली ही वाहने गंजून खराब होत आहेत. त्यामुळे त्या वाहनांचा लिलाव करुन निर्गती करण्याचे पोलिस प्रशासनाने निश्चीत केले आहे. तत्पुर्वी संबंधीत वाहन मालकांनी दोन महिन्यांच्या आत एमआयडीसी पोलिस स्टेशनला संपर्क साधून कायदेशीर खात्री देऊन ओळख पटवून आपापले वाहन घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर वाहन धारकांना या वाहनांवर हक्क सांगता येणार नाही. पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ८५ प्रमाणे त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारान्वये याबाबतचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.







