जळगाव – भादली ते भोलाणे रोडदरम्यान एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आला आहे. शासकीय रुग्णालयातील डॉ. अश्विनी देवचे यांनी याबाबत जळगाव तालुका पोलिस स्टेशनला दुरध्वनीद्वारे माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे ४५ ते ५० वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुष भादली-भोलाणे मार्गावर बेशुद्ध व बेवारस स्थितीत आढळून आला. त्याला तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ३४/२०२६ अन्वये बीएनएसएस कलम १९४ प्रमाणे नोंद घेण्यात आली असून, प्राथमिक तपास सहाय्यक फौजदार सुनील पाटील करत आहेत.
मृत व्यक्तीचे नाव, गाव व पत्ता अद्याप समजू शकलेला नाही. मयत पुरुषाचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्ष आहे. पंचांच्या उपस्थितीत मृतदेहाचा मरणोत्तर पंचनामा करण्यात आला आहे. मृताची ओळख पटेपर्यंत व त्याच्या नातेवाईकांचा शोध लागेपर्यंत शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीची ओळख अथवा त्याच्या नातेवाईकांबाबत कोणास माहिती असल्यास त्यांनी तातडीने जळगाव तालुका पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






