जळगाव : जळगाव येथील गाजत असलेल्या पोस्को आणि ड्रग्स प्रकरणातील हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ज्या हॉटेल व्यवस्थापनाने संशयीत आरोपी आणि पिडीत तरुणीला भाडे तत्वावर राहण्यास खोली दिली त्या हॉटेल व्यवस्थानपनाने तरुण व तरुणीची ओळख पटवण्यासाठी काही ठोस पुरावा घेतला होता का? तरुण आणि तरुणी यांचे एकमेकांचे नाते काय आहे याची पडताळणी केली होती का? असे मुद्दे आता शंकेच्या स्वरूपात पुढे येत आहेत.
पोक्सो अत्याचार प्रकरणातील दोन संशयित आरोपींना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय गफूर तडवी यांनी सोमवारी विशेष पोक्सो न्यायालयासमोर हजर केले. मात्र, तपासादरम्यान कोणतेही ठोस किंवा नवीन पुरावे समोर आले नसल्याचे सांगत पोलिसांनी आरोपींच्या पुढील पोलीस कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे तपासाच्या गतीवर आणि दिशेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी गौरव पुरोहित हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके रवाना केली आहेत. मात्र, अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
या संपूर्ण प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येत आहे. आरोपी आणि पीडित मुलगी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेल प्रशासनाने ओळखपत्रांची योग्य तपासणी केली होती का? अल्पवयीन मुलीसोबत संशयास्पद परिस्थितीत खोली देताना हॉटेल व्यवस्थापनाने कायदेशीर नियमांचे पालन केले होते का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत.
उपस्थित होत असलेले महत्त्वाचे प्रश्न म्हणजे फरार संशयीत आरोपी गौरव पुरोहितला अटक करण्यात विलंब का होत आहे? अधिक तपासासाठी पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी का केली नाही? ड्रग्स सारखा गंभीर विषय असतांना तपासात नवीन माहिती समोर आली नाही, यामागे नेमके कारण काय? हॉटेल व्यवस्थापनाने संशयास्पद व्यक्तींना खोली देताना आवश्यक पडताळणी केली होती का? हॉटेल मालक किंवा व्यवस्थापकाविरुद्ध कायदेशीर कारवाई होणार का? काय कारवाई होऊ शकते?
जर चौकशीत हॉटेल मालक किंवा व्यवस्थापनाने नियमांचे उल्लंघन केल्याचे, ओळखपत्रांची पडताळणी न केल्याचे किंवा गुन्हा लपविण्यास मदत केल्याचे निष्पन्न झाले, तर त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून कारवाई होऊ शकते. यासाठी पोलिसांनी हॉटेलची नोंदवही, सीसीटीव्ही फुटेज आणि कर्मचारी यांची चौकशी करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. असे अनेक प्रश्न या निमित्ताने जनतेत विचारले जात आहेत. आता सर्वांचे लक्ष फरार आरोपीच्या अटकेकडे आणि हॉटेल व्यवस्थापनाच्या भूमिकेबाबत होणाऱ्या पोलिस तपासाकडे लागले आहे.







