नागदुली गावात अवैध दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन

On: June 12, 2026 9:14 PM

जळगाव – एरंडोल तालुक्यातील नागदुली गावात देशी, विदेशी तसेच गावठी दारूची सर्रास अवैध विक्री होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. त्याबाबत ग्रामस्थांनी एरंडोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गावातील शांतता व सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. ग्रामपंचायती मार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे देखील या प्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. या अवैध दारु विक्रीविरोधात ग्रामपंचायतीत ठराव देखील मंजुर करण्यात आला आहे. नागदुली गावाच्या माजी पदाधिका-यांची हॉटेल सुरु असून संबंधीतांनी ग्रामपंचायतीकडून हॉटेल चालवण्याचे तसेच विदेशी मद्य विक्रीचा नाहरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याचा ठरावात उल्लेख करण्यात आला आहे.  

तक्रारीनुसार, गावात विविध ठिकाणी बेकायदेशीररित्या दारूची विक्री सुरू असून त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, वादविवाद आणि असभ्य वर्तनाच्या घटना वाढत आहेत. दारू सहज उपलब्ध होत असल्याने युवक वर्ग व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, यापूर्वीही अशा प्रकारच्या अवैध दारूविक्रीविरोधात आवाज उठविण्यात आला होता. मात्र, कठोर कारवाई न झाल्यामुळे संबंधितांचा पुन्हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी अवैध दारूमुळे गेल्या काही वर्षांत अनेक कुटुंबांचे नुकसान झाल्याचा दावा केला असून, काही व्यक्तींच्या मृत्यूचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने या तक्रारीची गंभीर दखल घेऊन गावातील अवैध दारूविक्रीवर तातडीने आळा घालावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment