‘आधी रस तर पूर्ण पिऊन घे…!’ म्हणताच दुचाकी चोरटा जाळ्यात

On: June 18, 2026 5:50 PM

नाशिक – नाशिक रोड पोलिसांनी एका दुचाकी चोरी प्रकरणाचा अत्यंत हुशारीने छडा लावत सराईत चोरट्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या “आधी रस तर पिऊन घे”…… या एका साध्या वाक्यामुळे आरोपीची घाबरगुंडी उडाली आणि त्याच्या हालचालींमधून चोरीचे गूढ उलगडले.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी सिन्नर फाटा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी ते महाराष्ट्र रसवंतीगृहावर उसाचा रस पिण्यासाठी थांबले होते. याच वेळी समोरच्या टेबलावर बसलेला एक तरुण पोलिसांना पाहून अस्वस्थ झाला. हातातील रसाचा ग्लास अर्धवट ठेवून तो घाईघाईने बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला.

तरुणाच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. त्याचवेळी पथकातील अंमलदार विशाल पाटील यांनी त्याला हटकत, “अरे, आधी रस तर पूर्ण पिऊन घे!” असे सहजपणे म्हटले. मात्र हे शब्द ऐकताच तरुण अधिकच घाबरला. त्याच्या चेहऱ्यावरील भीती आणि वागण्यात दिसणारी घालमेल पाहून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

सखोल चौकशीत त्याने आपले नाव ललित सागर देवरे (रा. सिन्नर) असे सांगितले. पुढील तपासात तो दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडून कसून चौकशी केली असता त्याने आतापर्यंत पाच दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

या कारवाईमुळे परिसरातील अनेक चोरीच्या घटनांचा उलगडा झाला असून चोरीस गेलेल्या वाहनांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नाशिकरोड पोलिसांच्या तत्परता, निरीक्षणशक्ती आणि सतर्कतेमुळे एक सराईत चोर जेरबंद झाला असून त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment