जळगाव : भुसावळ रेल्वे पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार कल्याण बाजारपेठ पोलिसांच्या हाती आला आहे. त्याला लवकरच भुसावळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. सलमान रफीक शेख उर्फ ताडी असे कल्याण बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यातील गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या कब्जातून देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
कल्याण बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीत एक जण पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत आंधळे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे सापळा रचून सलमान यास ताब्यात घेण्यात आले. सलमान याच्या विरोधात भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा ताबा भुसावळ पोलिसांकडे दिला जाणार आहे.






