जळगाव : जळगाव शहरातील नेहरू नगर परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा एमआयडीसी पोलिसांनी यशस्वी छडा लावत तिघा आरोपींना अटक केली आहे. अटकेतील तिघांकडून चोरीस गेलेले सुमारे २३ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू नगर परिसरात राहणारे फिर्यादी गोविंद रामदास पाटील हे पत्नीसमवेत नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी ८ जून २०२५ रोजी गावाबाहेर गेले होते. २० जून रोजी शेजाऱ्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिल्यानंतर ते तातडीने जळगाव येथे परतले. घरी आल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले असून चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तपास पथकाला तातडीने आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातून शाहरुख शहा सिकंदर शहा, मुकेश राजू परमार, दीपक राजू पाटील या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी घरफोडीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
सुमारे १५,००० रुपये किमतीचे ६ चांदीचे देव (एकूण वजन ६० ग्रॅम), ३,००० रुपये किमतीची एच.पी. कंपनीची लाल रंगाची गॅस शेगडी, ५,००० रुपये किमतीची पितळ व तांब्याची भांडी असा एकूण २३,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गाणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकातील पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत धनके, हे. कॉ. किरण चौधरी, पो. कॉ. नितीन ठाकूर, किरण पाटील, राहुल घेटे, समकांत साळुंखे, शशिकांत मराठे, योगेश घुगे आदींच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला. पोलिसांच्या तत्पर तपासामुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून चोरीस गेलेला मुद्देमालही परत मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.






