धरणगावात घरफोडीचा गुन्हा उघड – दोन आरोपी अटकेत

On: July 1, 2026 6:40 PM

जळगाव : धरणगाव येथे दाखल घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत दोघांना अटक केली असून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. घरफोडी करणा-यांकडून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धरणगाव येथील रहिवासी व या गुन्ह्यातील फिर्यादी २३ मार्च रोजी कुटुंबासह देवदर्शनासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे १ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत संशयितांचा शोध घेतला.

तपासादरम्यान संदीप थोरात (वय २६) व कार्तिक उर्फ आबा महाजन (वय २०), दोघेही रा. एकता नगर, संजयनगर, धरणगाव, यांना अटक करण्यात आली. तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

चोरट्यांकडून ६२ हजार रुपये रोख, ५८ ग्रॅम वजनाची सुमारे ३ हजार रुपयांची चांदीची लगड आणि २.२२ ग्रॅम वजनाची सुमारे १० हजार रुपयांची सोन्याची लगड असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास धरणगाव पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment