जळगाव : जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलिसांनी विशेष तपास मोहीम राबवून मोठे यश मिळवले आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि संशयितांवर सातत्याने पाळत ठेवत पोलिसांनी पाच अट्टल आरोपींना अटक केली.
ताब्यात घेण्यात आलेल्या गुन्हेगारांची चौकशी केली असता त्यांनी एकूण दहा गुन्ह्यांची कबुली दिली. त्यामध्ये घरफोडीचे नऊ आणि मोटार वाहन चोरीचा एक गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान पोलिसांनी अटकेतील पाचही जणांकडून 2 लाख 30 हजार रुपये किमतीचा घरफोडीतील मुद्देमाल तसेच दोन लाख रुपये किमतीच्या चार मोटारसायकली असा एकूण चार लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटकेतील गुन्हेगारांमधे गरजीत सिंग सज्जनसिंग बावरी, दीपक बापू पाटील, राजेश माणिक राठोड, सुमित संजय कोळी आणि महेश उर्फ संतोष भोई यांचा समावेश आहे. या टोळीचा घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय असून पुढील तपास सुरू आहे. या उल्लेखनीय कारवाईमुळे घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पुढील तपास जळगाव तालुका पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
या कारवाईत पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधिक्षक संदीप गावीत, डिवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शशीकांत पाटील व त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक नयन पाटील, पोलिस उप निरीक्षक विजय पाटील, प्रोबेशनरी पोलिस उप निरीक्षक यज्ञजीता येडले, हे.कॉ. प्रदीप राजपूत तसेच गुन्हे शोध पथकातील हवालदार अविनाश देवरे, योगेश पाटील, नरेंद्र पाटील, श्रीकांत बदर पोलिस नाईक कैलास इंगळे, पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकुर, शरद पाटील, दिपक देवरे आणि वाहन चालक अशोक पाटील व पंकज देशमुख यांनी सहभाग घेतला.







