जळगाव : भडगाव शहरातील बॅग हिसकावून चोरी करणाऱ्या टोळीचा यशस्वी छडा लावत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात आलेली एक मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
दिनांक 10 जुलै 2026 रोजी फिर्यादी यश हिरामण हटकर यांच्या तक्रारीवरून भडगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीकडील सुमारे 51,560 रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेली होती.
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखा आणि भडगाव पोलिसांनी तांत्रिक माहिती तसेच गोपनीय सूत्रांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. तपासात टोळीने भारत फायनान्स कंपनीच्या ग्राहकांकडून पैसे जमा होण्याची वेळ व हालचालींची माहिती मिळवून चोरीचा कट रचल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात उदय छोटे गायकवाड (वय 22, रा. अनकवाडी, ता. जि. धुळे), अनिल दिलीप पाटील (वय 31, रा. पळासखेडा, ता. भडगाव), विशाल मधुकर गांगुर्डे (वय 26, रा. पेंडगाव, ता. जि. धुळे), निलेश अण्णा पवार (वय 20, रा. अनकवाडी, ता. जि. धुळे), योगेश प्रकाश पवार (वय 22, रा. अनकवाडी, ता. जि. धुळे) अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान त्यांच्याकडून सुमारे 25,000 किंमतीची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील इतर संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपास भडगाव पोलिसांकडून करण्यात येत आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, डीवायएसपी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक सोपान गोरे, हे.कॉ. लक्ष्मण पाटील. पोलिस नाईक राहुल पाटील. पो.कॉ. इश्वर पाटील. जितेंद्र पाटील, भुषण पाटील, रिजवान शेख यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास महिला पोलिस उप निरीक्षक लक्ष्मी करंकार करत आहेत.







