जळगाव : विनापरवाना गावठी कट्टा कब्जात बाळगून दहशत माजवणा-या तरुणास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. अभिषेक संजय हवलदार असे जेरबंद करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या कब्जातून एक लाख बाविस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात एक इसम गावठी कट्टा बाळगत दहशत माजवत असल्याची माहिती सहायक फौजदार विजयसिंग पाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने पुढील कारवाई केली. गुन्हे शोध पथकातील पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत धनके, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, पोहेकॉ किरण चौधरी, पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी, पोहेकॉ गिरीश पाटील, पोना प्रदीप चौधरी, पोकॉ विशाल कोळी, पोकॉ सुभाष साबळे, पोकॉ योगेश घुगे यांच्या पथकाने गोपनीय माहितीचा माग काढत अयोध्या नगर ते गौरव हॉटेल दरम्यान अभिषेक संजय हवलदार या तरुणास गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले.
त्याच्या कब्जातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस व दुचाकी असा 1 लाख 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप चौधरी करत आहेत.





