जळगाव : रामानंद नगर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै २०२६ रोजी रात्री पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केटमधील पान मसाल्याच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी विविध कंपनीच्या सिगारेटच्या १० बॉक्ससह सुमारे ₹३७,५०० किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांनी गोपनीय माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढला. त्यानुसार सिद्धार्थ विनोद आढाळे (वय १९) आणि दीपक भगवान सोनवणे (वय २०, दोघेही रा. पिंप्राळा, जळगाव) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि एसडीपीओ नितीन गनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने केली. या कारवाईत पोलीस अमलदार सुधाकर अंभोरे, सुशील चौधरी, अतुल चौधरी आणि सागर नन्नवरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





