जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करीविरोधात वरणगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण 5 लाख 17 हजार 868 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. वरणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमितकुमार बागुल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 24 जुलै रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील कपिल वस्ती परिसरात सापळा रचण्यात आला.
यावेळी चेतन लक्ष्मण नारखेडे ( नशिराबाद, जि. जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील सिल्व्हर रंगाची इनोव्हा या वाहनाची तपासणी केली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.
घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आली. विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून जप्तीची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा डायल 112 वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी अमितकुमार बागुल व वरणगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.







