जळगाव पोलीस व आरपीएफचे संयुक्त कोंबिंग ऑपरेशन

On: July 29, 2026 1:48 PM

जळगाव : भुसावळ शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच रेल्वे परिसरातील भंगार, कोळसा आणि केबल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलीस दल आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत संयुक्त “कोंबिंग ऑपरेशन” राबवले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे व अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारवले यांच्या नेतृत्वात ही व्यापक कारवाई करण्यात आली.

या विशेष मोहिमेदरम्यान विविध गुन्ह्यांतील आरोपींची तपासणी करण्यात आली. रेल्वे पोलिसांच्या गुन्ह्यातील नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) असलेला सराईत आरोपी श्याम सुभाष शिरसाठ उर्फ श्याम काळ्या याला अटक करण्यात आली. दरम्यान, भुसावळ बाजारपेठ परिसरात कारवाई करताना शोफीक शहा शरीफ शहा याच्याकडून एक कट्टा जप्त करण्यात आला असून त्याच्यावर शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपनगर पॉवर प्लांट परिसरातील केबल चोरीच्या प्रकरणाचाही उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. आरोपी राजू मुरकुटे (रा. निंभोरा) याच्याकडून सुमारे ५० किलो केबल व केबल कापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधित चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

मोहीमेदरम्यान रेल्वे व दीपनगर परिसरातील ६० रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. तसेच २५ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. भंगार दुकाने व गोदामांचीही तपासणी करून गुन्हेगारी हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले.

या कारवाईत पकडण्यात आलेल्या सर्व आरोपींची अद्ययावत डिजिटल नोंद तयार करून जळगाव पोलीस व RPF यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. त्यामुळे भविष्यात रेल्वे मालमत्तेची चोरी, भंगार चोरी आणि इतर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल, अवैध भंगार खरेदी-विक्री किंवा गुन्हेगारीविषयी माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल 112 वर संपर्क साधावा. भविष्यातही अशा विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment