जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात लग्नाच्या अवघ्या २४ तासांत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नववधूने लस्सी पिण्याचा बहाणा करून घराबाहेर पडत साथीदारांच्या मदतीने पलायन केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे नवरदेवाच्या कुटुंबाची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत असून, परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका तरुणाचे एका तरुणीसोबत विवाह जुळवून देण्यात आला होता. मध्यस्थांच्या माध्यमातून हे लग्न ठरले होते. विवाहासाठी नवरदेवाच्या कुटुंबाने सुमारे दोन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला होता. नव्या सुनेच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.
लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी सत्यनारायण पूजेची तयारी सुरू असताना नववधूने लस्सी पिण्याची इच्छा व्यक्त केली. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेव आणि काही नातेवाईक तिला घेऊन बाहेर पडले. लस्सीच्या दुकानाजवळ पोहोचताच आधीपासूनच तेथे उभी असलेल्या एका कारमध्ये नववधू अचानक जाऊन बसली. काही क्षणांतच वाहन वेगाने निघून गेले. हा प्रकार लक्षात येताच नवरदेवाच्या कुटुंबीयांनी आरडाओरड करत स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारचा पाठलाग सुरू केला.
स्थानिकांच्या मदतीने सुमारे १० ते १५ किलोमीटरपर्यंत संशयित वाहनाचा पाठलाग करण्यात आला. अखेर वाहन अडवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. नंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
या घटनेमागे विवाहाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ‘लुटेरी नवरी’ टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा टोळ्या विवाहासाठी इच्छुक कुटुंबांना लक्ष्य करून लग्न लावून देतात आणि काही तासांत किंवा काही दिवसांत नववधू दागिने, रोख रक्कम किंवा इतर मौल्यवान वस्तू घेऊन पसार होते, असे यापूर्वीही अनेक प्रकरणांत समोर आले आहे.





