जळगाव : जळगाव शहरातील अल्पवयीन वाहन चालक विद्यार्थ्यांविरुद्ध जळगाव शहर वाहतुक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस अधीक्षक प्रशांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरातील मु.जे. महाविद्यालय परिसरात प्रोबेशनरी डिवायएसपी सह्याद्री बिरासे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई राबवण्यात आली. अशा स्वरुपाची तिव्र कारवाई यापुढे देखील सुरुच राहणार असल्याचे वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी म्हटले आहे.
या कारवाईत तब्बल 1 लाख 47 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अल्पवयीन वाहन चालक विद्यार्थ्यांच्या गोटात खळबळ माजली आहे. अल्पवयीन वाहन चालक विद्यार्थ्यांनी वाहन न चालवण्याकामी त्यांच्या पालकांसह शाळा महाविद्यालय प्रशासनाने देखील प्रबोधन करणे गरजेचे आहे असा सुर या कारवाई प्रसंगी ऐकण्यास मिळाला.
अल्पवयीन वाहन चालक विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांना देखील या वेळी समज देण्यात आली. 1 लाख 47 हजाराच्या दंडात्मक कारवाई दरम्यान 82 हजार रुपयांचा दंड जागेवरच वसुल करण्यात आला तर इ चलनच्या माध्यमातून 119 कारवाया करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक प्रशांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोबेशनरी डिवायएसपी सह्याद्री बिरसे, प्रशांत दरेकर यांच्यासह पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम तसेच त्यांच्या अठरा पोलिस अमलदारानी भर पावसात या कारवाईत सहभाग घेतला.
यापुढे अशाच स्वरूपाची कारवाई वाहतुकीचे नियम मोडणा-या तसेच हेल्मेट न वापरणा-या विविध विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी एवढेच नव्हे तर पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई होणार असल्याचे सुतोवाच देण्यात आले आहे. या माध्यमातून समाजात एक चांगला संदेश जाणार आहे.





