जळगाव – शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अर्ज पुढे पाठवण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या पंचायत समिती बोदवड येथील कनिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
तक्रारदार (वय ५२) हे वाद्य कलाकार असून त्यांनी शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर अर्जाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी पंचायत समिती, बोदवड येथे जमा करण्यात आली होती. अर्जाची चौकशी करून प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषद, जळगाव येथे पाठविण्यासाठी कनिष्ठ सहाय्यक उमेश शामकांत सपकाळे (वय ४९) यांनी सुरुवातीला ३ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.
तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर आरोपीने तडजोडीअंती ६०० रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार ३० जुलै २०२६ रोजी पंचायत समिती, बोदवड कार्यालयातील सामान्य प्रशासन शाखेबाहेरील गॅलरीमध्ये सापळा रचण्यात आला. यावेळी उमेश सपकाळे यांनी तक्रारदाराकडून ६०० रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचखोरास ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील हे.कॉ. बाळू मराठे, पो.कॉ. राकेश दुसाने व अमोल सुर्यवंशी आदींनी केली.






