डोक्यात दगड घातलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

On: August 1, 2026 2:21 PM

जळगाव : बहिणीसोबत आंतर जातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून शालकाने त्याच्या मेहुण्याच्या डोक्यात दगड घालून जबर जखमी केले होते. अगोदर मद्यप्राशन करुन मद्याच्या नशेतील मेहुण्याच्या डोक्यात दगड घालण्यात आला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मेहुण्याचा शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला. जामनेर तालुक्यातील फत्तेपुर पोलिस स्टेशन हद्दीतील या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

फत्तेपूर येथील सुभाषपुरा परिसरातील रहिवासी प्रशांत सुभाष चौधरी (वय २६) याने नजीकच्या गावातील एका तरुणीशी आंतरजातीय विवाह केला होता. याचा राग डोक्यात ठेवून त्याच्या शालकाने मेहुणा प्रशांत चौधरी यास गोड बोलून तोरणाळा जंगलात नेले. त्या ठिकाणी मद्यपान करून शालकाने त्याचा मेव्हणा प्रशांत चौधरी यांच्या डोक्यात भला मोठा दगड मारून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

मेहुणा मृत झाल्याचे गृहीत धरून शालकाने त्यास एका खड्डयात टाकून त्याच्या शरीरावर झाडाची पाने झाकून ठेवली होती. मुलगा घरी न आल्याने प्रशांतची आई सरला चौधरी यांनी फत्तेपूर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी शोध घेतला असता प्रशांत चौधरी जंगलात अर्धमेल्या अवस्थेत आढळून आला होता. प्रशांत यास प्रथम जळगाव व नंतर छत्रपती संभाजी नगर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान प्रशांतचा मृत्यू झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment