जळगाव : रावेर तालुक्यातील अभोडा या गावाच्या बस स्टँड परिसरात अवैधरीत्या गोमांस विक्री होत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना समजल्याने धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दोन संशयितांकडून अंदाजे प्रत्येकी तिनशे किलो गोमांस, कुऱ्हाडी व सुरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अभोडा गावातील बसस्टँड परिसरात पथकाने पाहणी केली. यावेळी एका इसमाने आपल्या राहत्या घरात दोन जनावरांची कत्तल करून गोवंशीय जनावरांचे मांस विक्रीसाठी ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी छापा टाकत उसमाना हसन कुरेशी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या गोमांसाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील यांच्याकडे तपासणीसाठी देण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला अभोडा गावातील चावडी भागातही गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्या दिशेने रवाना होऊन एका संशयितावर नजर ठेवली. पोलिसांना पाहून संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव इर्फान रेहमान ऊर्फ लंगड्या कुरेशी असे असल्याचे सांगितले. त्याच्या घरातूनही अंदाजे तिनशे किलो वजनाचे गोमांस, कुऱ्हाडी व सुरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मांसाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या संशयिताचा गुन्ह्यातील सहभाग तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. गोवंश कत्तलीबाबत कठोर भूमिका घेत दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित, अपर पोलीस अधीक्षक अनील बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक मनोज महाजन, हे.कॉ. इश्वर चव्हाण, जगदीश पाटील, समाधान ठाकुर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, राहुल परदेशी, विकार शेख व महिला कर्मचारी उषा मशाने आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.






