जळगाव : पत्रकार असल्याची बतावणी करत तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. कोमल बापुराव पाटील आणि जितेंद्र रूपसिंग चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी रफीक कुरेशी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तुमच्याकडे बंदी असलेले मांस असून तुमच्या विरुद्ध पोलिस कारवाई टाळायची असल्यास आम्हाला पाच लाख रुपये द्या अन्यथा कारवाईला सामोरे जा अशी तक्रारदारास (फिर्यादीस) धमकी दिल्याचा दोघांविरुद्ध आरोप आहे. पाच लाख रुपये न मिळाल्याने दोघा तोतया पत्रकारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिस घटनास्थळी आले. मात्र या अगोदर तक्रारदार रफीक कुरेशी यास दोघांनी पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती पुढे आली.
या प्रकरणी तक्रारदार रफीक कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघा तोतया पत्रकारांविरुद्ध रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पत्रकार असल्याची बतावणी करून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याने या घटनेची शहरात चर्चा सुरू झाली आहे. अधिक तपास पीएसआय राजेंद्र उगले करत आहेत.







