जळगाव : एकाच नावाच्या दोन प्रसूत माता… बालरोग विभागातील अतिदक्षता कक्षात उपचार घेत असलेली दोन नवजात बाळे… आणि केवळ आईचे नाव पुकारल्याने झालेला गोंधळ! शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) शनिवारी (दि. ८) नवजात बाळांच्या अदलाबदलीचा धक्कादायक प्रकार समोर आला. काही वेळाने नातेवाईकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि दोन्ही बाळे त्यांच्या संबंधित मातांकडे सोपविण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
शनिवारी सकाळी ७.४५ वाजता एका १६ वर्षीय अल्पवयीन मातेची प्रसूती झाली. तिच्या बाळाचे वजन १ किलो ६०० ग्रॅम होते. त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता मनीषा लखन भिल (वय २०) यांची प्रसूती झाली. त्यांच्या बाळाचे वजन ३ किलो ३०० ग्रॅम होते. दोन्ही नवजात बाळांना उपचारासाठी बालरोग विभागातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. काही तासांनंतर मनीषा भिल यांच्या बाळाची प्रकृती सुधारल्याने त्याला स्तनपानासाठी आईकडे नेण्यासाठी नातेवाईकांना बोलावण्यात आले.
मात्र, दोन्ही मातांचे नाव सारखे असल्याने येथेच गोंधळ झाला. कर्मचाऱ्यांनी केवळ आईचे नाव पुकारले आणि दुसऱ्या मातेच्या नातेवाईकांनी बाळ ताब्यात घेतले. काही वेळानंतर मनीषा भिल यांचे नातेवाईक बाळ घेण्यासाठी आले. त्यावेळी नावाच्या साधर्म्यामुळे बाळांची अदलाबदल झाल्याचे लक्षात आले. प्रकार समोर येताच जीएमसी कर्मचाऱ्यांनी तातडीने संबंधित नातेवाईकांकडून बाळ ताब्यात घेतले. यानंतर आवश्यक पडताळणी करून दोन्ही नवजात बाळे त्यांच्या संबंधित मातांकडे सुपूर्त करण्यात आली.
प्रशासनाने घेतली तातडीची बैठक
घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगीता बावस्कर यांनी रविवारी (दि. ९) सकाळी ११ वाजता बैठक घेतली. बालरोग विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोसे, डॉ. गिरीश राणे यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेण्यात आली.
अल्पवयीन मातेच्या प्रकरणात तक्रार
दरम्यान, एका मातेचे वय प्रसूतीच्या वेळी १६ वर्षे असल्याने जीएमसी प्रशासनाकडून संबंधित नातेवाईकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नवजात बाळाची ओळख केवळ आईचे नाव पुकारून न करता बाळाची ओळख पटविणारी अतिरिक्त माहिती तपासल्यानंतरच बाळ नातेवाईकांच्या ताब्यात देणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. सुदैवाने हा प्रकार काही वेळातच लक्षात आल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला.






