जळगाव : धुळे जि. प. तील सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करून शिफारसपत्रासाठी तब्बल 4 लाख 80 हजार रुपयांची लाच स्विकारणा-या धुळे जिल्हा परिषदेच्या फिटरसह त्याच्या खाजगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पारोळा येथे रंगेहात पकडले. बुधवार दि. 12 ऑगस्टच्या दुपारी पारोळा शहरातील हॉटेल ग्रीन पार्क येथे झालेल्या या सापळा कारवाईने जिल्हा परिषदेत खळबळ माजली.
पुरुषोत्तम मंगाजी वाघ (फिटर – सार्वजनिक बांधकाम विभाग, जि. प. धुळे) आणि बारकू काळू पाटील (खाजगी सिक्युरिटी एजन्सी सुपरवायझर) अशी कारवाई झालेल्या दोघांची नावे आहेत. यातील तक्रारदार हे गेल्या चौदा महिन्यांपासून धुळे जिल्हा परिषदेत तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. नियमानुसार सलग साठ दिवस सुरक्षा रक्षकाचे काम केल्यावर सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी होते. त्यानंतर सुरक्षा रक्षकाला मंडळाच्या नियमांनुसार रोजगार, वेतन, बोनस, सामाजिक सुरक्षा आणि इतर कल्याणकारी सुविधांचा लाभ मिळतो.
तक्रारदारासह इतर पाच सुरक्षा ‘रक्षकांच्या नोंदणीसह शिफारसपत्रासाठी संशयित आरोपी पुरुषोत्तम वाघ व बारकू पाटील यांनी प्रती सुरक्षा रक्षक दिड लाख रुपयांप्रमाणे एकूण साडे सात लाखांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने यापुर्वी एक लाख रुपये दिले होते. उर्वरीत रक्कम काम झाल्यानंतर द्यायचे ठरले होते. मात्र काम न झाल्याने तक्रारदाराने संशयीतांना विचारणा केली. त्यास राहिलेल्या साडे सहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. अखेर पुर्वीचे एक लाख वजा करुन 4 लाख 80 हजार रुपये देण्या घेण्याची तडजोड निश्चीत झाली.
तक्रारदाराने 11 ऑगस्ट रोजी जळगाव एसीबीकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली. ठरल्यानुसार 12 ऑगस्ट रोजी पारोळा येथील हॉटेल ग्रीन पार्क येथे सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित आरोपी बारकू पाटील याने तक्रारदाराकडून 4 लाख 80 हजार रुपयांची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. जळगाव एसीबीचे पोलिस अधिक्षक योगेश ठाकुर, सापळा अधिकारी श्रीमती रेश्मा अवतारे (पोलिस निरीक्षक नंदुरबार कॅंप) यांच्यासह सापळा पथकातील पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, श्रेणी पोलिस उप निरीक्षक सुरेश पाटील, हवालदार सुनिल सुनिल वानखेडे, किशोर महाजन, बाळु मराठे, पो.कॉ. राकेश दुसाने, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर, मनोज पाटील आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.






